बुलढाणा : संतनगरी शेगावात आज अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. शेगाव पोलिसांनी तब्बल दोन क्विंटल गांजा जप्त केला आहे. या कारवाईत शेगाव पोलिसांनी ४२ लाख रुपयांचा गांजा, दुचाकी आणि मोबाइल जप्त केले. गांज्याचे बाजार मूल्य एक्केचाळीस लाख चाळीस हजार इतके असल्याने विदर्भ पंढरीसह पोलीस विभागही हादरलाय!  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेगाव नगरीतील कचरा डेपो (डंपिंग ग्राउंड) परिसरात आज ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले असून एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे. डोंगरसिंग जुलालसिंग झाडे (४७, रा. कुऱ्हा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(सी), २० (ब) (ii) (सी), २२ (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन विनायक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्यावर आव्हानात्मक घटनेच्या तपासाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.

या कारवाईत हिरवट, काळसर, कळीदार बिजा असलेला दोन क्विटंल सात किलो गांजा हिरो प्रो-कंपनीची मोटारसायकल, एक रियल मी कंपनीचा मोबाईल, असा एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कचरा डेपोजवळ आरोपी डोंगरसिंग झाडे आणि त्याचा साथीदार गुलजार शेख (रा. पिंपळखुटा, ता. पातुर, जि. अकोला) हे गांजासह आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी छापा घातला असता आरोपी डोंगरसिंग जुलालसिंग झाडे यास पकडण्यात आले. मात्र आरोपी गुलजार शेख हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. आरोपीच्या प्राथमिक चौकशीनंतर या ठिकाणावरून दोन क्विटंल गांजा, दुचाकी, मोबाईल जप्त करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two quintals of ganja seized in santnagari shegaon buldhan news scm 61 amy