नागपूर : बोर व्याघ्र प्रकल्पात दुसऱ्यांदा अस्वलांची दोन दुर्मिळ ‘ल्युसिस्टिक’ पिल्ले त्यांच्या आईसोबत वनभ्रमंती करताना आढळून आल्याने हा व्याघ्रप्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी २०२० मध्ये एक मादी अस्वल एक काळय़ा व एक ‘ल्युसिस्टिक’ पिल्लासोबत आढळून आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोर व्याघ्रप्रकल्पातील वनरक्षक मनेशकुमार सज्जन सोमवारी, १९ डिसेंबरला त्यांच्या दुचाकी वाहनाने कळमेट तपासणी नाक्याकडे जात होते. यादरम्यान आमगाव तपासणी नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर वनक्षेत्रातून निघून डांबररस्त्यावर येताना त्यांना एक अस्वल दिसले. वाहन बंद करून तिला कॅमेराबद्ध करत नाही तोच अस्वलीाच्या पाठीमागून एक तपकिरी रंगाचे सुमारे एक वर्ष वयाचे पिल्लू रस्त्यावर आले. त्यापाठोपाठ पुन्हा एक तपकिरी रंगाचे पिल्लू आले. हा क्षण त्यांनी कॅमेऱ्यात टिपला. यापूर्वी १९ मे रोजी त्यांना याच परिसरात एक अडीच वर्षे वयाचे पिल्लू आढळून आले होते. त्याचाही जन्म बोर व्याघ्रप्रकल्पातच झाला होता.

याच व्याघ्रप्रकल्पात १३ मार्च २०२० ला एका मादी अस्वलाच्या पाठीवर बसून एक काळय़ा रंगाचे व एक तपकिरी रंगाचे पिल्लू शुभम पाटील या पर्यटकाला जंगल सफारीदरम्यान आढळून आले होते. तसेच २०२० मध्ये चौथ्या टप्प्यातील वन्यप्राणी प्रगणनेदरम्यान बोर व्याघ्रप्रकल्पात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये २४ मार्च २०२० ला एक मादी अस्वल एक काळय़ा व एक तपकिरी रंगाच्या सुमारे तीन ते चार महिने वयाच्या पिल्लांना पाठीवर बसवून वनभ्रमंती करतानाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये आले होते. २०२० मध्ये जन्मलेले ‘ल्युसिस्टिक’ अस्वल आता सुमारे तीन वर्षांचे झाले आहे.

सोमवारी आढळून आलेले ‘ल्युसिस्टिक’ पिल्लू सुमारे एक वर्ष वयाचे आहेत. एक काळय़ा व एक तपकिरी रंगाच्या जन्म देणाऱ्या मादी अस्वलाचेच हे पिल्लू असावेत. रंगद्रव्यांच्या कमतरतेमुळे बोर व्याघ्रप्रकल्पातील मादी अस्वलीकडून ‘ल्युसिस्टिक’ म्हणजेच तपकिरी रंगाचे पिल्लू जन्माला येत आहेत. यामुळे प्राण्यांच्या शरीरावरील केसांचा रंग बदलतो, इतर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, यावर अभ्यासपूर्ण निरीक्षण गरजेचे आहे.

 मनेशकुमार सज्जन, वनरक्षक, बोर व्याघ्रप्रकल्प

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two rare leucistic bear cubs at bor tiger project ysh
Show comments