नागपूर : भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दुचाकी अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. दुचाकीस्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये होणाऱ्या मृत्युंच्या संख्येमध्ये निश्चित घट होऊ शकते. त्यामुळे वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३८ नुसार नवीन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना, खरेदीवेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरवणे आवश्यक आहे. याबाबत दुचाकी वितरकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दोन हेल्मेट वापरणे अनिवार्य होणार आहे. परंतु, वाहनासोबत दोन हेल्मेट सांभाळणे प्रचंड अडचणी असल्याने यावर नागपूर दोन जागतिक दर्जाच्या संशोधकांनी महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. यामुळे हेल्मेटची घडी करून तो सहज हाताळता येणार आहे. हे संशोधन काय आहे? आणि कसा राहणार ‘फोल्डिंग हेल्मेट’ ते बघुया.
हेल्मेट घालून दुचाकी चालवणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. परंतु, हेल्मेट सांभाळणे हे वाहन चालकासाठी फार कठीण असते. त्यामुळे आता सुरक्षित घडी करून ठेवता येईल अशाप्रकारचे ‘फोल्डिंग हेल्मेट’ तयार करण्याचे कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दोन संशोधकांनी सुरू केले आहे. यावर संशोधकांना ‘स्वामित्व हक्क’ही (पेटंट) मिळाले आहे. भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे व एम.एस्सी.ची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी हे संशोधन केले आहे.
हेही वाचा…पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या निर्णयाची चौकशी करा-वडेट्टीवार
वाहन उभे असताना हेल्मेट कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉ. ढोबळे आणि आदिती देशमुख यांनी वाहन उभे असल्यावर दोन्ही हेल्मेट कसे ठेवता येतील याकरिता ‘फोल्डिंग हेल्मेट’ची कल्पना प्रत्यक्षात आणली. ‘फोल्डिंग हेल्मेट’चे ‘डिझाईन’ बनवून त्यातील सर्व कार्यपद्धती व मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहील याची काळजी घेतली आहे. या ‘फोल्डेड हेल्मेट’करिता ‘स्वामित्व हक्क’ देखील मिळवले आहे. हेल्मेट तयार करण्याचे कार्यही सुरू झाले आहे. या हेल्मेटची मजबुती नियमित हेल्मेटप्रमाणे राहून त्याद्वारे अपघाताच्या वेळी डोक्याला इजा होणार नाही, याप्रकारचे साहित्य वापरण्यात येणार आहे. ‘फोल्डिंग हेल्मेट’ व्यवस्थित उघडून ते डोक्यात घालता येईल, याची देखील काळजी घेण्यात आली आहे. काही दुचाकींमध्ये एक हेल्मेट ठेवण्याची व्यवस्था असते. आता नवीन संशोधनाद्वारे तयार केलेले फोल्डिंग हेल्मेट ठेवण्याचीही व्यवस्था होईल.