नागपूर : भारतातीलच नाही तर परदेशातीलही संग्रहालये आता बोलकी होणार आहेत. येत्या १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनी केनिया आणि युगांडा येथील ‘मी किप्सिगिस म्युझियम आहे’ आणि ‘किगुलु म्युझियम’ ही दोन क्रांतीकारी संग्रहालये पर्यटकांशी संवाद साधणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्याालयातील रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सारंग धोटे यांनी ही दोन नाविन्यपूर्ण स्मार्टफोन ॲप्लिकेशन तयार केली आहेत. या दोन्ही ॲप्लीकेशन्स दर्यापूर महाविद्यालयात फेब्रुवारी २०२० मध्ये डॉ. धोटे यांनी सुरुवात केलेल्या ‘टॉकिंग ट्री’ संकल्पनेच्या उल्लेखनीय प्रतिकृती आहेत. त्या आयओएस, अँड्रॉईड आणि विंडोज भ्रमणध्वनीवर वापरता येतात.

अँड्रॉइड वापरकर्ते इंटरनेट जोडणीशिवायदेखील ते वापरु शकतात. २०२२ मध्ये त्या संबंधित देशात कॉपीराइट करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी धोटे यांनी नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयासाठी एक संवादात्मक ॲप्लिकेशन विकसित केले. पर्यटकांना क्यूआर कोड स्कॅन करून संग्रहालयातील प्रतिकृतीशी संवाद साधता येतो. या दोन नवीन ॲप्लिकेशनचा अत्याधुनिक प्रयोगात किप्सिगिस लोकांचा मनमोहक इतिहास, कला आणि विज्ञान समाविष्ट आहे. पर्यटकांना त्यांचा भौतिक वारसा या माध्यमातून जाणून घेता येणार आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’चा गोंधळ! परीक्षा एकच, गुणवत्ता यादी मात्र स्वतंत्र

केरिचो जिल्ह्यातील दोलायमान कपकाटेट वसाहतीमध्ये स्थित, किप्सिगिस संग्रहालय हे केनियामधील किप्सिगिस समुदायाच्या दृढ भावनेचा आणि विलक्षण योगदानाचा दाखला आहे. ‘मी किप्सिगिस म्युझियम आहे’ या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यागतांना किप्सिगिस संस्कृतीला जाणून घेता येणार आहे. यामुळे संग्रहालय भेट एक आकर्षक आणि ज्ञानवर्धक अनुभव असेल.

जागतिक संग्रहालय दिनाच्या शुभ मुहूर्तावर ही दोन नाविन्यपूर्ण स्मार्टफोन ॲप्लिकेशन्स पर्यटकांसाठी सुरू करताना अतिशय आनंद होत आहे. ‘मी किप्सिगिस म्युझियम आहे’ आणि ‘किगुलु म्युझियम’ ही अनुक्रमे केनिया आणि युगांडामधील अभ्यागतांसाठी संग्रहालयाच्या अनुभवात क्रांती घडवून आणण्यासाठी तयार आहेत. – डॉ. सारंग धोटे, सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय

हेही वाचा – केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रांच्याच शहरात अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत; नागपुरात ‘ई- रिक्षा’ चालकांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ

‘मी किप्सिगिस म्युझियम आहे’ हे ॲप्लिकेशन म्हणजे किप्सिगिसच्या पुरुष आणि स्त्रियांच्या प्रयत्नांना श्रद्धांजली आहे. हे संवादी ॲप्लिकेशन केवळ स्थानिकांनाच लाभ देणार नाही तर परदेशी पर्यटकांसाठीदेखील एक मौल्यवान संधी प्रदान करेल. ज्यामुळे त्यांना किप्सिगिस लोकांच्या अद्वितीय वारशाची प्रशंसा करता येईल. – फिलिप चेरुयोट, अभिरक्षक, किप्सिगिस म्युझियम

पूर्वी किगिलुच्या प्रमुखाच्या मालकीच्या प्रतिष्ठित इमारतींपैकी एका इमारतीत असलेले संग्रहालय बसोगाच्या पारंपरिक उपासना पद्धती, स्थानिक पाककृती, औषधी ज्ञान आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. ही मौल्यवान माहिती आता तरुण पिढीला सहज सांगता येणार आहे. यातून सांस्कृतिक वारसा जतन केला जाऊ शकतो. – अब्राहम किटोलवा, अध्यक्ष, युगांडा कम्युनिटी म्युझियम असोसिएशन

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two revolutionary museums will interact with the tourists rgc 76 ssb