लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा : शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आणि आरटीओ विभागाच्या डोळ्यांदेखत खाजगी स्कूल व्हॅन धुमाकूळ घालत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चाललेला असताना शाळा प्रशासन आणि आरटीओ विभाग मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शहरातील एक खाजगी शाळेच्या दोन स्कूल व्हॅन एकाच नंबर प्लेटच्या असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

एकच नंबर असलेल्या दोन स्कूल व्हॅन रस्त्यावर सुसाट जात असताना एका सजग नागरिकाने कॅमेऱ्यामध्ये कैद करून ही बाब लक्षात आणून दिली. आरटीओ विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून या दोन व्हॅन चालकांसोबतच आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

आणखी वाचा-नागपूर : प्रेमासाठी वाट्टेल ते! अल्पवयीन प्रेयसीचा आयफोनसाठी हट्ट; प्रियकराने…

शहरातील जवळपास सर्वच खाजगी शाळांमध्ये खाजगी स्कूल व्हॅनचा सुळसुळाट आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून नेणे, व्हॅनमध्ये सिलेंडर ठेवणे, भंगार झालेल्या व्हॅन वापरणे, भरधाव वेगाने गाडी चालवणे अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत ये-जा करावे लागते. यासाठी पालकांनाही वेठीस धरले जाते. एखादी अनुचित घटना घडली की आरटीओ विभागाला जाग येते आणि काही दिवस गाडी रुळावर येते. थातूरमातूर कारवाई करून पुन्हा चिरीमिरी करून ‘जैसे थे स्थिती’ होते. असाच एक प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा आरटीओ विभाग आणि शाळा प्रशासन यांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मागील अनेक महिन्यांपासून ह्या दोन्ही खाजगी स्कूल व्हॅन चिमुकल्याना घेऊन रस्त्यावर धावत आहेत. मात्र शहरात दोन गाड्या एकच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभागाला याची साधी कल्पना सुद्धा नव्हती हे त्याहून गंभीर आहे. इतकेच नाही तर या दोन्ही दोन्ही व्हॅन गॅस किटवर चालत असून संस्थाचालक खुलेआमपणे या खाजगी स्कूल व्हॅनमध्ये घरगुती गॅस भरतांना दिसून येत आहे. याची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. हा सगळा प्रकार भंडारा शहरातील एसआरसी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये खुलेआम सुरू आहे.

आणखी वाचा-पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याचे अधिकार आहेत? न्यायालयाने स्पष्टच सांगितले…

या व्हॅनला शोधून कारवाई करणार असल्याचा आरटीओ विभागच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. पण गेली अनेक महिने सर्रासपणे अधिकाऱ्यांच्या नाकावर टीचून शहरात या दोन्ही स्कूल व्हॅन धावत होत्या इतकच नाही, स्कूल व्हॅन मध्ये लहान चिमुकले मुले देखील बसलेले असतात त्यामुळे एखादा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

भंडारा जिल्ह्यात आणखी किती वाहने एकाच नंबर प्लेटची धावत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे एका वाहनाने अपघात जरी झाला तर तो गुन्हा लपवण्यासाठी दुसऱ्या वाहनाला तोच नंबर प्लेट लावला जातो. पण हा सगळा प्रकार शहरात सुरू असून सुद्धा पोलीस विभाग, आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two school vans of private school with same number plate ksn 82 mrj