नागपूर: दोन बहिणींनी छत्तीसगढमधील भिलाई शहरात राहणाऱ्या आजीचा संपत्तीच्या वादातून खून केला. आजीच्या घरातील दागिने, पैसे लुटून नागपूर गाठले. हे हत्याकांड उघडकीस येताच छत्तीसगढ पोलिसांनी दोन्ही बहिणींना नागपुरातून अटक केली. अतिंदर सहानी (६२) असे मृत आजीचे तर दीपज्योत कौर (२१) आणि बिट्टो (१९) अशी आरोपी बहिणींची नाव आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपज्योत आणि बिट्टो यांची आई नागपुरातील पाचपावली हद्दीत राहते. तिची आजी अतिंदर सहानी या भिलाई शहरातील कुबेर अपार्टमेंटमध्ये राहायच्या. आजीकडे गडगंज संपत्ती होती. त्यामुळे दीपज्योत नेहमी आजीकडे पैशांची मागणी करीत होती. मात्र, आजी पैसे देण्यास तयार नव्हती. त्यामुळे दीपज्योत ही आजीकडे गेल्यानंतर नेहमी वाद घालून भांडण करीत होती. पैसे न दिल्यास आजीला ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र, आजीने न घाबरता पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या दीपज्योतने आजीचा खून करून सर्व संपत्ती हडपण्याचा कट रचला. त्या कटात लहान बहीण बिट्टो हिलाही सहभागी करून घेतले. २४ जुलैला दोघीही छत्तीसगढ एक्स्प्रेसने दुर्ग रेल्वेस्थानकावर उतरल्या. तेथून रिक्षाने आजीच्या घरी पोहचल्या. दरवाजा ठोठावल्यानंतर आजीने दार उघडले. घरात घुसताच दीपज्योतने आजीचे हाताने तोंड दाबले तर बिट्टोने आजीचे दोन्ही हात आणि पाय ओढनीने करकचून बांधले. आजीच्या तोंडात कापड कोंबला. आजीला जमिनीवर पाडले आणि पैशाची मागणी केली. तिने पुन्हा नकार देताच तिच्या डोक्यात स्टीलच्या बाटलीने वार केले. त्यात रक्तबंबाळ होऊन आजीचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा >>>मोठी बातमी! २५ ऑगस्टच्या परीक्षेत कृषी सेवकांचा २५८ पदांच्या समावेशासंदर्भात महत्त्वाचा….
पैसे-दागिने लांबवले
दीपज्योत आणि बिट्टोने आजीचा खून केल्यानंतर कपाटातील दागिने एका बॅगेत भरले. त्यानंतर काही रक्कम त्यांच्या हाती लागली. घरातील दागिने, रक्कम आणि जमिनीची कागदपत्रे घेऊन दोघीही बहिणी आजीच्या स्कूटीने रेल्वेस्थानकावर पोहचल्या. त्यांनी रेल्वेस्थानकावर गाडी बेवारस सोडून दिली आणि रेल्वेने नागपुरात परतल्या.
नागपुरातून अटक
आजीचा खून केल्यानंतर दोघीही नागपुरात आल्या. दोन ते तीन दिवस त्यांनी वाट बघितली. घरातून दुर्गंध येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी भिलाई पोलिसांना फोन केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या मदतीने दोन्ही बहिणींचा प्रताप समोर आली. भिलाई पोलिसांनी नागपुरातून दोन्ही बहिणींंना ताब्यात घेतले.