वर्धा: वादाचे दुसरे नाव असलेल्या येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात दोन विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले आहे. त्यापूर्वी दोन तास आधी विद्यार्थी नेता असलेला राजेश सारथी हा विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याचाच राग ठेवून हे निलंबन झाल्याचा योगेश जांगिड याने आरोप केला. तो व त्याचा मित्र हे पीएचडी.चे विद्यार्थी आहेत.
लोकसत्ता ऑनलाईन सोबत बोलताना ते म्हणाले की, हे आंदोलन कनिष्ठ शाखेतील विद्यार्थ्यांनी केले होते. तशी सूचना विद्यापीठ प्रशासनास दिली होती. आम्ही विद्यार्थी नेते म्हणून त्यात सहभागी झालो. सकाळी अकरा वाजता एकास बोलावून या आंदोलनात सहभागी होऊ नका म्हणून सांगण्यात आले होते. ते ऐकले गेले नाही म्हणून वचपा काढला, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा… खापरखेडा विद्युत केंद्राला ‘एमपीसीबी’ची नोटीस; राख विल्हेवाटीबाबत कायमस्वरूपी नियोजनाच्या सूचना
तर यावर प्रतिक्रिया देताना कुलगुरू रजनीश कुमार म्हणाले हा आरोप चुकीचा आहे. त्यांच्या विविध गैर कृत्याबद्दल चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. समितीने कारवाई करण्याची शिफारस केली होती. ती अमलात आणली. यात आंदोलनाचा संबंध जोडण्याचे कारण नाही.