बुलढाणा : दोन आत्महत्याच्या घटनांनी नांदुरा आणि मलकापूर नगरी हादरली. नांदुरा येथे बारावीच्या विध्यार्थ्याने गळफास घेत तर मलकापूर येथे एका युवकाने रेल्वे गाडीसमोर स्वतःला झोकून देत आत्मघात केला.
बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या पुर्व संध्येला १० फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास कल्पेश हरिष भुतडा (वय १८) याने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे आढळून आले. वडील हरिष भुतडा यांचे रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. कल्पेश अभ्यासात हुशार होता.म्हणजे आर्थिक अडचण नव्हती आणि सपशेल नापास व्हायची भीती नव्हती. तरीही त्याने नॉयलॉन दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपविली.त्याने हे टोकाचे पाऊल संभाव्य अपयशाच्या, जास्त वा अपेक्षित टक्केवारी मिळणार नाही या धास्तीने उचलले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शहरातील पालकांसह समाजमन सुन्न झाले आहे.
‘ते’ हेलावणारे दृश्य…
वडील संध्याकाळी दुकान वरुन घरी आले असता त्यांनी कल्पेश कुठे आहे असे विचारले असता तो त्याच्या खोलीत अभ्यास करीत असल्याचे समजले . वडील त्याला जेवायला बोलावण्यासाठी गेले असता खोलीचा दरवाजा आतून बंद केल्याचे त्यांना दिसले. वडीलांनी त्याला आवाज दिला. मात्र आतुन कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलांनी खोलीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीतून डोकावून पाहिले असता आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. कल्पेश याने नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. मुलगा हुशार असल्याने कल्पेश ची आई आणि आजी प्रयाग राज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते.
आल्यावर मुलगा आणि नातुचा मृतदेह पाहल्यावर त्यांच्यावर काय बेतले हे त्यांनाच ठाऊक? समंजस असलेल्या कल्पेश ने आपल्या कृतीने कुटुंबावर होणाऱ्या परिणामाचाही विचार केला नाही का? बारावी म्हणजे जीवन आहे असे समजले का? असे अनेक प्रश्न या घटनेने उपस्थित केले आहे…
तीन दिवस स्थानकावर फिरत राहिला अन…
मलकापूर येथील रेल्वे स्थानक येथे महाराष्ट्र कोल्हापूर एक्सप्रेस समोर उडी घेऊन एका युवकाने केलेली आत्महत्या अशीच चिंतनास भाग पाडणारी होय. या २५ वर्षीय युवकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर शेकडो प्रवाश्या समोर आपले जीवन संपविले.
या घटनेने प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडाला! महिला, युवतीच्या आर्त आवाजानी स्थानक परिसर शोकाकुल झाला.
आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली नसुन आत्महत्या करणारा युवक गेल्या तीन दिवसापासून प्लॅटफॉर्मवर फिरताना दिसत होता. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न हजारो प्रवाशी्यांच्या मनात रेंगाळत राहिला.