वर्धा : सेलू तालुक्यातील हिंगणी गावातील १५ वर्षीय दोन शाळकरी मुलींचं अपहरण झाल्याची तक्रार रविवारी दाखल झाली होती. शनिवारी त्या शाळेत जाण्यासाठी घरून बाहेर पडल्या होत्या. मात्र शाळेत गेल्यावर त्यांनी कागदपत्रे आणण्यासाठी सेलू येथे जायचे असल्याचे शिक्षकास सांगून बाहेर पडल्या. दिवसभर त्या कुठे होत्या याचा मागमूस लागला नाही. मात्र रात्री घरी परत न आल्याने त्यांची पालकांनी रात्रभर शोधाशोध केली. शेवटी पालक सेलू पोलीसांकडे गेले.
हेही वाचा >>> वर्धा: काँग्रेसची ‘भारत जोडो’ नंतर आता ‘जनसंवाद’ यात्रा
तक्रार दाखल झाल्यावर सेलू पोलीसांनी तांत्रिक माहितीवर भिस्त ठेवून तपास सुरू केला. दोन्ही मुली गडचिरोलीत असल्याचे आढळून आले. पोलीस पथक नवेगाव गडचिरोली येथे पोहचले. स्थानिक चडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेवून आरोपी शुभम चुतरी (२१) यास ताब्यात घेतले. त्याच्याच घरी दोन्ही मुली आढळून आल्यात. पोलीस उपनिरीक्षक धनंजय पांडे तसेच पोलीस कर्मचारी अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुक्साना शेख यांनी ही कामगिरी फत्ते केली.