गडचिरोली : काही काळापासून गडचिरोली जिल्ह्यात वाघांचे हल्ले कमी झाले असले तरी वाघांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. परिणामी हे वाघ आता गावात प्रवेश करू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. असाच एक व्हिडीओ सार्वत्रिक झाला असून यात दोन वाघ देसाईगंज तालुक्यातील कोकडी गावाच्या वेशीवरील पाणवठ्यावर पाणी पीत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रसंग एका भाजी विक्रेत्याने आपल्या मोबाईलमध्ये टिपला.
हेही वाचा – यवतमाळ: ऑटो उलटून १३ विद्यार्थी जखमी
हेही वाचा – वरिष्ठ वकिलाकडूनच वकील महिलेचा विनयभंग; म्हणाली, “ऑफिसमध्ये एकटक बघायचा, अन् मला…”
देसाईगंज आणि गडचिरोली हे दोन तालुके वाघाच्या हल्ल्यांमुळे होरपळून निघाले आहेत. मधल्या काळात हल्ले कमी झाले असले तरी गावाजवळ वाघाचे दर्शन होणे नित्याचेच झाले आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातील तुळशी-कोकडी गावात एका वाघाने प्रवेश केल्यामुळे नागरिकांसह वन विभागाची चांगलीच भंबेरी उडाली. तत्पूर्वी दोन वाघ गावाशेजारी असलेल्या पाणवठ्यावर पाणी पिताना दिसून आले. या मार्गावरून जाणाऱ्या एका भाजी विक्रेत्याने हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपला. सध्या समाजमाध्यमावर ही चित्रफीत सार्वत्रिक झाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.