नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘तलाववाली’ ही वाघीण आणि ‘जंजीर’ हा वाघ पर्यटनाच्या या हंगामापासून पर्यटकांना दिसलेले नाहीत. अभयारण्यातील या हंगामातील पर्यटन सुरू झाल्यानंतर या दोघांच्याही पाऊलखुणा किंवा हालचाल पर्यटकांना आढळलेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही वाघांच्या बेपत्ता होण्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि वन्यजीव संवर्धकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…

टिपेश्वर अभयारण्यातील वाघांच्या बेपत्ता होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील या अभयारण्यातून वाघ बेपत्ता होण्याचे प्रकार घडले आहेत. ‘स्टार’ हा वाघ आणि ‘पिलखान’ ही वाघीण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे काय झाले हे कुणालाही ठाऊक नाही. या घटना अभयारण्यात वाघांच्या संरक्षणासाठी प्रभावी शोध आणि तपासणी यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित करतात. संवर्धन तज्ज्ञांनी वनविभागाला ‘तलाववाली’ आणि ‘जंजीर’ यांच्या शोधासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. कॅमेरा ट्रॅप बसवणे, तज्ञ ट्रॅकर्सची मदत घेणे आणि शोधमोहीम राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास केवळ बेपत्ता वाघांचाच नाही, तर अभयारण्याच्या पर्यावरणीय समतोलाचाही धोका निर्माण होऊ शकतो. वनविभागाकडून मात्र यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. मात्र, वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक मार्गदर्शकांकडून लवकरात लवकर योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात अभयारण्य पर्यटनासाठी बंद होण्यापूर्वी या दोन्ही वाघांची हालचाल होती. पावसाळ्यानंतर पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यानंतर ऑक्टोबरपासून या वाघांचा कोणताही ठावठिकाणा नाही. या अभयारण्यातून यापूर्वीदेखील वाघ बेपत्ता झाले आहेत. जेव्हा ‘स्टार’ हा वाघ बेपत्ता झाला तेव्हा त्याचा शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. मात्र, वनविभागाला यश मिळाले नाही. यावेळी तसे प्रयत्न होत नसल्याचे वन्यजीवप्रेमी आणि संवर्धकाचे म्हणणे आहे. दरम्यान, या अभयारण्यातून आजतागायत अनेक वाघांनी इतरत्र स्थलांतर केले आहे. त्यामुळे या वाघांनीसुद्धा इतरत्र स्थलांतर तर केले नाही ना, अशीही एक शंका व्यक्त केली जात आहे. कारण या काळात वाघ इतरत्र स्थलांतर करतात. यापूर्वी उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यातून ‘जय’ हा वाघ बेपत्ता झाला होता. तर अलीकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ‘माया’ ही वाघीण देखील बेपत्ता झाली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two tigers missing tipeshwar wildlife sanctuary rgc 76 css