नागपूर : निवडणूक आयोगाने काल निवडणुकीची घोषणा केली आणि विविध पक्षांमध्ये जणू एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी युद्ध सुरू झाले. ही कुरघोडी एरवीदेखील सुरूच असते, निवडणुकीत त्याला जणू युद्धाचे स्वरूप येते. जंगलातील प्राण्यांचे तसे नसते. ते लढतात ते केवळ आपल्या अधिवास क्षेत्रासाठी. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दोन वाघांमधील अधिवासाची लढाई नेहमीच दिसून येते, पण आता पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनीही आता त्यावर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाने या व्याघ्रप्रकल्पातील या दुर्मिळ घटनेची ध्वनिचित्रफीत लोकसत्ताला उपलब्ध करून दिली.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात अधिवासासाठी दोन वाघांमध्ये होणारे भांडण अनेकदा बघायला मिळते. एका वाघाने दुसऱ्या वाघाच्या अधिवास क्षेत्रात प्रवेश केला, की त्यांच्यात भांडण होणारच. मग ते भांडण कधी रक्तबंबाळ होईपर्यंत देखील चालले आहे. तर काही घटनांमध्ये दोनपैकी एका वाघाचा मृत्यूदेखील झाला आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पात असे प्रसंग क्वचितच दिसून येतात. पावसाळा संपून पर्यटनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. ताडोबा पाठोपाठ पेंच व्याघ्रप्रकल्पदेखील पर्यटकांची पसंती आहे. विशेषकरून ताडोबाच्या तुलनेत पेंच व्याघ्रप्रकल्पाचे जंगल, इथला निसर्ग पर्यटकांना प्रेमात पाडणारा आहे. त्यामुळे वाघ दिसला नाही तरी पर्यटक येथून निराश होऊन परत जात नाहीत. अलीकडेच पेंच व्याघ्रप्रकल्पातील खुर्सापार येथे टी-१४ विरुद्ध टी-५१ या दोन वाघिणीमधील संघर्ष पाहायला मिळाला. या दोन्ही वाघिणीमध्ये नाट्यमय संघर्ष झाला.
जंगलात जगणे हे फक्त अन्नापुरते नसते तर ते हक्काचा अधिवास आणि वर्चस्व बद्दल असते. या दोन्ही वाघिणीनी त्यांच्या प्रमुख अधिवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी भयंकर युद्ध पुकारत आपले सामर्थ्य दाखवले. दोन्ही बाजूंनी पर्यटकांची वाहने होती आणि पर्यटकासमोर टी-१४ विरुद्ध टी-५१ या दोन वाघिणीमध्ये संघर्ष झाला. सुरुवातीला या दोन्ही वाघिणी जंगलातील रस्त्याच्या एकाच बाजूने आल्या आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जायला लागल्या. आणि अचानक त्यांच्यात लढाई सुरू झाली. ही लढाई अधिवासासाठी होती की वर्चस्वासाठी हे कळले नाही, पण अक्षरशः त्या दोघींच्या डरकाळ्याचा आवाज वाढला. त्यामुळे दोन्ही बाजूच्या पर्यटकांची वाहने वेगाने मागे फिरली. थोड्याच वेळात दोघीही शांत झाल्या आणि आपापल्या मार्गाने परत निघाल्या. दोन वाघ किंवा वाघिणीमधील अशा चकमकी निसर्गाच्या नाजूक संतुलनावर प्रकाश टाकतात, जिथे प्रत्येक दिवस जगण्याची लढाई असते. पेंच व्याघ्रप्रकल्पात बऱ्याच दिवसानंतर पर्यटकांना हा प्रसंग याची देही याची डोळा अनुभवायला मिळाला. पेंच व्याघ्रप्रकल्पानेदेखील ही ध्वनिचित्रफीत त्यांच्या “इन्स्टाग्राम” या समाजमाध्यमावर सामाईक केली आहे.