नागपूर : तामिळनाडूतील वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक दशकांपासून फटाके न फोडता दिवाळी साजरी करत आहेत. लगतच्या वेतांगुडी पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांना इजा पोहचू नये म्हणून गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे यंदा सर्वच स्तरावर कौतुक केले जात आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर: माजरीच्या नागरी वस्तीत वाघाची घुसखोरी; लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घेतला तरुणाचा बळी
वेतांगुडी, पेरिया कोल्लुकुडी पट्टी आणि चिन्ना कोल्लुकुडी पट्टी येथील सिंचन तलावावर काही वर्षांपूर्वी स्थलांतरित पक्ष्यांनी गर्दी केली होती. तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी फटाके न फोडता दिवाळी साजरी केली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी देखील त्याठिकाणी पक्षी आले आणि तेव्हापासून गावकऱ्यांनी फटाके न फोडण्याचा नियमच घालून घेतला. हे पक्षी पाळीव प्राण्यांसारखे आहेत आणि त्यांना त्रास झालेला सहन होणार नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांच्या तरुण पिढीला देखील फटाके फोडण्यापासून दूर ठेवले आहे.
हक्काचे निवासस्थान…
स्वित्झर्लंड, रशिया, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांमधून येणाऱ्या पक्ष्यांसाठी तामिळनाडूतील वेतांगुडी पक्षी अभयारण्य हे हक्काचे निवासस्थान बनले आहे. सुमारे पाच दशकांपासून स्थलांतरित पक्ष्यांच्या दोनशेहून अधिक प्रजातीसाठी हे अभयारण्य सर्वाधिक सुरक्षित व संरक्षित प्रजनन स्थळांपैकी एक ठरले आहे.
त्यांनाही कळते?
एका वर्षी या दोन गावांनी फटाके फोडले नाहीत. त्यानंतर सलग अनेक वर्षे स्थलांतरित पक्ष्यांनी या परिसराची निवड केल्यामुळे या पाखरांनी फटाकेरहित गावाची नोंद केली असल्याचे तज्ज्ञ आणि अभ्यासकांचे म्हणणे आहे. पक्ष्यांच्या या वर्तणुकीचा आणखी अभ्यास होत आहे.
इतर सणांतही… दिवाळीच नाही तर इतर कोणत्याही सणांना, विवाह सोहोळा, उत्सवांना ते फटाके फोडत नाहीत. त्यामुळेच येथील पक्षीवैभव टिकून आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे आणि त्यामुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामामुळे प्रत्येक दिवाळीला वनखात्याच्यावतीने गावकऱ्यांना मिठाई वाटप केली जाते.