बुलढाणा : बुलढाणा खामगाव (बोथा मार्ग ) राज्य मार्गांवर आज झालेल्या विचित्र अन् भीषण अपघाताने काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय आला. आज दुपारी ही दुर्घटना घडली. अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. वाऱ्यामुळे काही वेळातच दुचाकी पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. मात्र, दुचाकी चालकाने धाडस आणि प्रसंगावधान दाखवून उडी मारल्याने तो केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावला.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, सुखरूप बचावलेल्या युवकाचे नाव अयान खान आहे. हा युवक कंझारा, ता. खामगाव, जि. बुलढाणा येथील रहिवासी आहे. बुलढाणा तालुक्यातील धाड येथील रहिवासी आपल्या मामाला भेटण्यासाठी तो कंझारा येथून दुचाकीने जात होता. खामगाव -बोथा मार्गावरून जात असताना हे वाहन अपघातग्रस्त होऊन पेटले. पाहतापाहता दुचाकी पूर्ण पेटली. या ‘बर्निंग टू व्हिलर’चा व्हिडिओ समाज माध्यमावर वेगाने व्हायरल होत आहे.
वाहन पेटल्याची दुसरी घटना
फेब्रुवारी महिन्यात चालते वाहन अपघातानंतर पेटल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी समृद्धी महामार्ग वर मागील गुरुवारी, विस फेब्रुवारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव चारचाकी वाहन पेटले होते . यामुळे दोन प्रवाश्याचा होरपळून (जळून) दुर्देवी करुण अंत झाला तर एक जण गंभीर जखमी झाला होता . अपघातता साठी कुप्रसिद्ध हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरील येथे ही भीषण दुर्घटना घडली होती. कार चालकाने पेटत्या वाहनातून उडी घेतल्याने तो बचावला होता.
समृद्धी महामार्ग वरील दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) टोल नाक्याजवळ हा विचित्र अपघात घडला होता. दुसरबीड जवळील टोलनाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर हुंडाई आयटेन कार (क्रमांक- एम एच -०४एल बी- ३१०९) कठड्याला धडकली. समृद्धी महामार्गाने सदर कार मुंबईतहुन अकोल्याच्या दिशेने जात असताना चॅनेल क्रमांक ३१८.८ जवळ दुर्घटना घडली. चालक अभिजीत अर्जुन चव्हाण वय पस्तीस वर्ष मुंबई यांचे कार वरील नियंत्रण सुटले. यामुळे वाहन मिडीयम मधील ‘क्रॅश बॅरिअर’ला धडकून सदर (बॅरियरची) पट्टी कार च्या समोरील भागातून घुसून आरपार पाठीमागून निघाली. यामुळे कार ने तात्काळ पेट घेतला. यामध्ये अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे वय चाळीस वर्ष आणि राजू महंतलाल जयस्वाल वय बत्तीस वर्ष (दोन्ही राहणार मुंबई )यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला होता . चालक अभिजीत अर्जुन चव्हाण वय पस्तीस वर्ष हा गंभीर जखमी झाला होता.