अकोला : नायलॉन मांजामुळे गळा चिरुन दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अकोल्यात मंगळवारी सायंकाळी घडली. किरण प्रकाश सोनोने (३५) असे मृतकाचे नाव आहे. नायलॉन मांजामुळे ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले होते. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सवात सर्रासपणे प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर होत आहे. या नायलॉन मांजामुळे शहरात अनेक दुर्घटना घडल्या. शहरात एनसीसी कार्यालयाजवळील उड्डाणपुलाजवळून दुचाकीने जात असतांना अकोट फैल येथील रहिवासी किरण सोनोने यांचा कळा चिरल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घटली. गळा चिरल्याने घटनास्थळावर त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले होते. नागरिकांनी तत्काळ गंभीर जखमी किरण सोनोने यांना उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा…वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…
मकर संक्रांती सणाला पतंगबाजीच्या खेळातून सर्वजण आनंद घेतात. मात्र, प्रतिबंधित घातक नायलॉन चायना मांजामुळे सर्वसामान्यांच्या जीवाला मोठा घोर लागला. नायलॉन मांजाला रोखण्यात अपयश आले असून प्रशासनाच्या नाकावर टिचून सर्रास त्याची विक्री व वापर सुरूच आहे. या मांजामुळे शहरात एकाचा बळी गेला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पतंगबाजीसाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होतो. हा नायलॉन मांजा प्रतिबंधित असतांनाही सर्वत्र तो दिसून येत आहे. प्रशासनाकडून केवळ कारवाईचा देखावा होत असल्याचा आरोप झाला. या नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर उठल्याचे विविध घटनांवरून अधोरेखित होते. जुने शहर भागातील गुरुदेव नगर येथे नायलॉन मांजामुळे एका महिलेचा पाय कापल्या गेल्याची दुर्दैवी घटना काल घडली. कलावती मराठे यांच्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
हेही वाचा…बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
उपचारादरम्यान त्यांच्या पायाला चक्क ४५ टाके पडले आहेत. आज मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा जोर चांगलाच वाढला. शहरातील खोलेश्वर भागात व्यावसायिक गणेश श्रीवास्तव आपले दुकान बंद करून घरी जात असतांना वाटेत त्यांच्या डोळ्याला नायलॉन मांजामुळे गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केले जात आहे. सायंकाळी एका दुचाकी चालकाचा नायलॉन मांजामुळे बळी गेला. प्रशासनाकडून नायलॉन मांजावर कारवाईचा केवळ फार्स ठरल्याचे बोलल्या जात असून संताप व्यक्त केला जात आहे.