नागपूर : नुकताच शासकीय नोकरीवर लागलेल्या मुलीच्या कार्यालयाला सुटी असल्यामुळे ती मित्राच्या दुचाकीवरुन बसून घराकडे निघाली. निघताना तिने आई-वडिलांना फोन करुन माहिती दिली. मात्र, काळाने तिचा घात केला.
घरी पोहचण्यापूर्वीच एका काळरुपी ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. दुसरीकडे मुलगी घरी पोहचत असल्यामुळे रस्त्याकडे डोळे लावून बसलेल्या आईवडिलांसमोर रुग्णवाहिकेतून थेट मुलीचा मृतदेहच समोर दिसला.
काळजाच्या तुकड्याला पांढऱ्या कपड्यात बघून आई-वडिलांनी मोठ्याने हंबरडा फोडला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. काजल देशराम भंडारकर (२५, चिखली, सडक अर्जूनी, जि. गोंदीया) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे तर कोमेश चेतराम झोडे (२६, सुंदरी-परसोडी, ता. साकोली. जि. भंडारा) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.
काजल भंडारकर ही प्रादेशिक मनोरूग्णालयात नोकरीला आहे. किरायाची खोली करून ती नागपूरातच राहाते. बुधवार सुटीचा दिवस असल्याने तिला घरी जायचे होते. सायंकाळपर्यंत घरी येते, असा निरोपही तिने आईला दिला. दरम्यान तिचा मित्र कोमेश झोडे हा कामानिमीत्त नागपुरात आला होता. काम आटोपल्यानंतर तो गावी जाणार होता. एकटा जाण्याऐवजी त्याच्यासोबत काजलही घरी जाण्यास निघाली. कोमेश हा दुचाकी चालवत होता तर काजल मागे बसली होती. कळमना परिसरातील चिखली चौकाकडून भंडारा रोडकडे जाणाऱ्या उड्डानपुलावरून जात असताना काळरुपी ट्रकचालकाने दुचाकीला मागून धडक दिली आणि पळून गेला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. काजल ही रक्तबंबाळ झाली होती. तिचे डोके दुभाजकाला आदळल्यामुळे फुटले होते. पोलिसांनी त्या दोघांनाही मेयो रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केले. तर कोमेशवर उपचार सुरु केले. याप्रकरणी कोमेशच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती काजलच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
शवविच्छेदनानंतर तिचे पार्थिक कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. काजल येणार म्हणून वाट पाहणाऱ्या पालकांना मुलीचे पार्थिव पाहून आईने हंबरडा फोडला.
पोलीस उपायुक्तांनी पोहचवले रूग्णालयात
पोलीस उपायुक्त निकेतन कदम त्याच मार्गाने जात होते. रस्त्यावर लोकांची गर्दी पाहून ते थांबले. त्यावेळी काजल गंभीर जखमी अवस्थेत होती. योगायोग असा की त्याचवेळी रुग्णवाहिका त्याच मार्गाने जात होती. त्या वाहनाने जखमींना मेयो रूग्णालयात पोहोचविले. मात्र, उपचारादरम्यान काजलचा मृत्यू झाला.