लोकसत्ता टीम
गोंदिया: मध्यप्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यातील जंगलात शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री सुमारास पोलीस-नक्षल चकमक झाली. ज्यामध्ये दलमच्या एरिया कमांडर आणि गार्ड असलेल्या दोन ज्येष्ठ महिला नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले. या दोन्ही महिला नक्षलींवर १४-१४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. बालाघाट जिल्ह्यात गेल्या वर्षीही पोलिसांनी वेगवेगळ्या तीन घटनेत ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
आयजीपी बालाघाट संजय कुमार, बालाघाटचे पोलीस अधीक्षक समीर सौरभ आणि हॉक फोर्सचे उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आहेत . बालाघाटचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजता गढी पोलीस स्टेशन हद्दीतील कडला जंगलात हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यात जवानांनी सुनीता आणि सरिता या दोन महिला नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले.
हेही वाचा… गोंदिया: बाजार समितीच्या १२६ जागांसाठी २४१ उमेदवार
सुनीता ही टाडा दलमच्या भोरम देव, एरिया कमांडरमध्ये एसीएम भोरम देव होती. ती सध्या विस्तार दलममध्ये काम करत होती. तर सरिता नक्षलवादी कबीरची रक्षक होती. त्यासोबत ती खट्यामोचा दलममध्ये राहात होती. सध्या ती विस्तार दलममध्ये सक्रिय होती.
दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले की, मृत नक्षलवाद्यांकडून बंदुका, काडतुसे, मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांची शस्त्रे आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या घटनेनंतर बालाघाट पोलिसांनी कडलाच्या जंगल परिसरात हॉकफोर्ससोबत संयुक्तरीत्या शोधमोहीम सुरू केली असल्याची माहिती बालाघाट जिल्हा पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी दिली.