शहरातील कळंब मार्गावर दोन युवकांना दोन देशी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गाझी अली अफसर अली रा. कळंब चौक व प्रफुल्ल भारत शंभरकर रा. सेजल रेसिडन्सी, यवतमाळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सोमवारी गस्ती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पांढरकवडा मार्गावरील मालानी बाग समोर दोन तरुण पिस्टल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून मिळाली.
हेही वाचा >>> बच्चू कडूंनी टोचले अधिकाऱ्यांचे कान; म्हणाले “अपंगांच्या योजना…”
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ आरटीओ परिसरात पोहचून तरुणांचा शोध घेतला. मालानी बाग समोर दोन तरुण संशयास्पद स्थितीत उभे होते. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीच्या काळया रंगाची मैग्जीन असलेल्या दोन पिस्टल (किंमत प्रत्येकी ५० हजार) आढळल्या. पिस्टल ताब्यात घेऊन पाहाणी केली असता जिवंत काडतुसही सापडले. एकूण एक लाख दोन हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली.