नागपूर : दारु पिऊन दुचाकीने स्टंटबाजी करणे दोन युवकांच्या जीवावर बेतले. उड्डाणपुलावर शर्यत खेळताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. ही घटना गुुरुवारी पहाटेच्या सुमारास नरेंद्रनगरातील उड्डाणपुलावर घडली. आदर्श रमेश समर्थ (२४, जुना बाबुलखेडा, पार्वतीनगर) आणि आदित्य राकेश मेश्राम (१८, किरणापूर, हुडकेश्वर) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जून विश्वकर्मा (१९, भगवाननगर), आदित्य मेश्राम आणि आदर्श समर्थ हे तिघेही मित्र आहेत. तिघेही बेरोजगार असून दारु पिण्याच्या सवयीचे आहेत. आदर्शवर पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल आहे. आदर्शकडे पल्सर दुचाकी असून त्याला वेगाशी स्पर्धा करण्याची सवय आहे. तो नेहमी उड्डाणपुलावर स्टंटबाजी करण्याच्या सवयीचा होता. आदित्य आणि आदर्श दोघे पल्सर या दुचाकीने तर अर्जून हा अॅक्टीव्हाने गुरुवारी पहाटे दोन वाजता फिरायला निघाले.
हेही वाचा >>>‘एमपीएससी’: उत्तरतालिका जाहीर; पूर्व परीक्षा २०२४ संदर्भात महत्त्वाची बातमी…
त्यांना नरेंद्रनगर उड्डाणपुलावर स्टंटबाजीच्या चित्रफिती काढायच्या होत्या. त्यामुळे तिघेही दोन दुचाकींनी उड्डाणपुलावर पोहचले. त्यात आदर्श हा दारुच्या नशेत होता. त्याने अर्जूनला स्टंटबाजी करताना छायाचित्र आणि चित्रफित काढण्यास सांगितले होते. ठरल्यानुसार, आदर्श आणि आदित्ये पल्सरवर बसले. आदर्शने सुसाट दुचाकी चालवून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उड्डाणपुलाच्या मधोमध त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी दुभाजकाला धडकली. या धडकेत दोघेही दुचाकीत फसून जवळपास २०० मीटरपर्यंत घासत गेले. यादरम्यान, त्यांच्या डोक्याला दुभाजकाचा मार लागला. भ्रमणध्वनीने चित्रिकरण करणाऱ्या अर्जूनने लगेच धाव घेतली. त्यानंतर उड्डाणपुलावरुन जाणाऱ्या एका वाहनचालकाला थांबवले. दरम्यान, प्रतापनगरचे पोलीस उपनिरीक्षक सतीश भोले हे पथकासह तेथे पोहचले.
हेही वाचा >>>‘एमपीएससी’: ‘या’ पंधरा हजारांवर विद्यार्थ्यांचा निकाल रखडला..काय आहे कारण?
त्यांनी गंभीर जखमी दोघांनाही मेडिकल रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळपर्यंत उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तासाभराच्या अंतराने दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद
तीनही मित्र नरेंद्रनगर उड्डाणपुलावर नेहमी स्टटंबाजी करण्यासाठी जात होते. चहा पिण्यासाठी जाण्याचा बहाणा घरी सांगून तिघेही घराबाहेर पडत होते. आदर्श समर्थ हा सुसाट दुचाकी चालवून स्टंटबाजी करीत होता. त्याने ‘झिकझॅक’ प्रकारे दुचाकी चालविल्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की आदर्श आणि आदित्य दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हा सर्व प्रकार एका इमारतीवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.