पेढी नदीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामुंजा येथे घडली.मोहम्मद अरबाज मोहम्मद साबीर (२०) व शहबाज शहा असद शहा (१८) दोघेही रा. यास्मीननगर, अमरावती, अशी मृतांची नावे आहेत. मोहम्मद अरबाज व शहबाज शहा हे दोघे आपल्या अन्य तिघा मित्रांसह कामुंजा येथे पेढी नदीत पोहायला गेले होते.
पाचही मित्र नदी पात्रात पोहायला उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने मोहम्मद अरबाज व शहबाज शहा हे दोघे बुडाले. हा प्रकार मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. आवाज ऐकून गावकऱ्यांनी तातडीने तेथे धाव घेतली.
हेही वाचा : नागपूर : फक्त व्हीआयपींसाठीच वाहतूक पोलीस ‘अलर्ट मोडवर’ ; नागपुरात लागले फलक
त्यानंतर घटनेची माहिती वलगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वलगावचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी गावकऱ्यांच्या मदतीने मोहम्मद अरबाज व शहबाज शहा यांना नदी बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.