बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मोताळा तालुक्यातील दोन युवक पार राज्यात वेगळ्याच ‘कामात’ गुंतले होते! त्यांनी आंतरराष्ट्रीय अट्टल टोळीसोबत तेलंगणा राज्यातील राष्ट्रीय कृत बँकेत दरोडा टाकत मोठाच हात मारला. तेलंगणा पोलिसांनी सुरू केलेल्या तपास दरम्यान या सिनेस्टाईल अन धाडसी दरोड्याचे मोताळा कनेक्शन उघडकीस आले आहे. या दरोड्यात मोताळा तालुक्यातील दोघांचा समावेश असून त्यातील एकाला तेलंगणा पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
आज रविवारी, ८ डिसेंबर रोजी ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे.यामध्ये तेलंगणा राज्याचे पोलीस पथक मोताळा (जिल्हा बुलढाणा) तालुक्यात येऊन गेल्याचे उघड झाले आहे. या पथकाने काटेकोर गुप्तता पाळत ही कारवाई केली. यामुळे जिल्हा पोलीस दलातील मोजक्या अधिकाऱ्यांनाच कारवाई आणि घटनेची माहिती असल्याचे आज स्पष्ट झाले. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार तेलंगणा राज्यातील तब्बल १४ कोटींच्या दरोडा प्रकरणात आरोपी हिमांशू भिकमचंद झंवर राहणार (मोताळा जिल्हा बुलढाणा ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. मोताळा तालुक्यातील च पुन्हई येथे राहणारा सागर भास्कर गोरे हा आरोपी मात्र फरार झाला आहे. त्याचा तेलंगणा पोलिसांचे पथक युद्धपातळीवर शोध घेत आहे.
हेही वाचा…विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
तिघांना अटक
तेलंगणा राज्यांमध्ये दोन आठवड्यांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया वर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणाचे मोताळा कनेक्शन उघडकीस आले .तब्बल १४ कोटी रुपयांच्या दरोडामध्ये सात जणांच्या टोळीचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले. या टोळीतील दोघे जण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्याचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तेलंगणा पोलिसांनी या टोळी मधील ३ जणांना पकडण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील एक आरोपी मोताळा येथील हिमांशू भिकमचंद झंवर (वय ३० वर्षे) तर फरार आरोपींपैकी एक सागर भास्कर गोरे (वय 32) हा पुन्हई येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या महिन्यात १८ नोव्हेंबर रोजी रायपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. ७ जणांच्या या टोळीने जवळच्या शेतातून बँकेच्या आवारात प्रवेश करीत खिडकी तोडली आणि बँकेत प्रवेश केला. ‘गॅस कटर’च्या साह्याने ‘स्ट्राँग रूम’ मध्ये प्रवेश करीत तीन ‘लॉकर’ कापले. या टोळीने १३.६१ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी ‘छेडछाड’ सुद्धा केली होती. चोरीची रक्कम सात समान समभागांमध्ये विभागणी केल्यानंतर ही टोळी १९ नोव्हेंबर रोजी हैदराबाद मधील भाड्याचे घर सोडून त्यांच्या मूळ राज्यात पसार झाली.
हेही वाचा…‘डिजीटल अरेस्ट’ हे भविष्यातील सर्वात मोठे संकट
वारंगल चे पोलीस आयुक्त अंबर किशोर झा यांनी आरोपींच्या शोधासाठी १० विशेष पथके तयार केली. पारंपरिक तपासाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पथकांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील ३ सदस्यांना पकडण्यात यश मिळविले. अटक केलेल्या आरोपींमध्ये उत्तर प्रदेश मधील शहवाजपूर येथील अर्षद अन्सारी (३४ वर्षे) आणि शाकीर खान उर्फ बोलेखान हे दोघे आणि हिमांशू भिकमचंद झंवर, (राहणार मोताळा, जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश मधील ककराला गावातील सूत्रधार मोहम्मद नवाब हसन यासह उर्वरित ४ संशयितांचा पोलीस पथके कसोशीने शोध घेत आहे. अक्षय गजानन अंभोरे आणि सागर भास्कर गोरे तसेच साजिद खान अशी फरार आरोपींची नावे आहेत. यातील सागर गोरे हा मोताळा तालुक्यातील पुन्हई गावचा रहिवासी असल्याचे कळते. अटक आरोपींकडून पोलिसांनी २.५२ किलो सोन्याचे दागिने १० हजार रुपये रोख आणि कारसह १.८० कोटी रुपयांचा मुद्धे माल जप्त केला आहे.