नागपूर : निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक फुटाळा तलाव अलीकडे बेशिस्त कारवायांचे केंद्रबिदू ठरत आहे. येथे ‘सेल्फी पॉईंट’ म्हणून उभारण्यात आलेल्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये दोन युवकांनी गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करूनही या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. येथे अनेक वास्तूंची दुरवस्था झाली आहे.शिल्पे एकतर तुटली आहेत किंवा गायब आहेत.
तिकीट खिडक्या आणि भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर धूळखात आहे. या घटनेबाबत संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, हे दु:खद आहे. मुलांना याबाबत शिक्षण दिले पाहिजे. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांची देखभाल करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागपूरच्या युवकांनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. या घटनेनंतर फुटाळा तलाव व परिसराची प्रतिष्ठा जपण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्पाचे काम रखडल्याचे वृत्त तीन दिवसांपूर्वी लोकसत्ताने प्रकाशित केले होते. नागपूरच्या सौंदर्यात भर घालू शकणारे जागतिक दर्जाचे फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्प सध्या धूळखात आहे. फुटाळा तलावावर प्रेक्षक दीर्घिका, बहुमजली वाहनतळ आणि सिमेंट रस्ता तसेच फुटाळा तलावात संगीत कारंजे बसवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यातील प्रेक्षक दीर्घिका, बहुमजली वाहनतळ आणि सिमेंट क्रॉक्रीटचा रस्त्याचे काम महामेट्रोकडे आहे. तर नागपूर सुधार प्रन्यासकडे संगीत कारंजे बसवण्याचे काम आहे.
केंद्रीय रस्ते निधी, राज्य सरकार आणि नासुप्रच्या निधीतून हा प्रकल्प होत आहे. नागपूर शहराला पर्यटन क्षेत्रात नावलौलिक मिळवून देण्याची क्षमता आहे. परंतु अतिशय उत्साहात काम सुरू झालेल्या प्रकल्पाच्या विरोधात पर्यावरणवादी न्यायालयात गेले आणि प्रकल्प रखडला आहे. पर्यटकांचे आकर्षण म्हणून ओळखली जाणारी ही प्रेक्षक दीर्घिका आता गंजत चालली आहे. काही भागाची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. या परिसराचे सौंदर्य वाढविण्याच्या हेतूने साकारलेली शिल्पे एकतर तुटलेली आहेत किंवा गायब झाली आहेत. तिकीट खिडक्या आणि त्या आवारात स्थापित करण्यात आलेले भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरवरही धूळ आहे.