यवतमाळ : देवकार्यासाठी वर्धा नदीत अंघोळीसाठी उतरलेले दोन तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यातील एकाला बाहेर काढण्यात यश आले, मात्र दुसरा वाहून गेल्याने त्याचा शोध सुरू आहे. ही घटना यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमवेर सांवगी येथील नदीच्या संगमावर आज शुक्रवारी सकाळी घडली. विकास अमर येडमे (२०), रा. कोसारा, ता. मारेगाव असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ-चंद्रपूर सीमेवरील सावंगी येथे वर्धा आणि वणा नदीचा संगम आहे. त्यामुळे या गावाला धार्मिक महत्त्व आहे. हा संगम यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा अशा तीन जिल्ह्यांच्या वेशीवर आहे. त्यामुळे येथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. आज येथे चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठावरील दिंदोडा घाटावर वरोरा तालुक्यातील बांबर्डा येथील एका कुटुंबीयांचे आज देवकार्य होते. त्यानिमित्ताने त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व समाजातील लोक या देवकार्यासाठी सावंगी संगमावर आले होते. या कार्यासाठी मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील येडमे कुटुंबीयसुद्धा गेले होते. सकाळी काही लोक आंघोळ करून नदी बाहेर आले. त्यावेळी विकास येडमे हा बांबर्डा येथील एका नातेवाईकासह नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले. सध्या पाऊस कोसळल्याने नदीला भरपूर पाणी आहे. या पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. याचवेळी कोसारा येथील कवडू येडमे हे आंघोळ करून नदीकाठी आले होते. त्यांना परिवारातील दोन तरुण बुडताना आढळले. त्यांनी तत्काळ पाण्यात उडी मारली. बाम्बर्डा येथील तरुणाला बाहेर काढण्यात त्यांना यश आले. विकास याचा हात धरून त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा हात सुटला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. याची माहिती स्थानिक प्रशासनास देण्यात आली. पोलीस, महसूल विभागाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. विकासचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे.

हेही वाचा – पेव्हर ब्लॉकचे मंजूर काम विश्राम गृह प्रांगणात; सुरू केले विश्राम भवन परिसरात? आमदार मलिक यांची तक्रार

येडमे कुटुंबीय नदीत ज्या ठिकाणी आंघोळीसाठी गेले होते. तिथे डोहसदृश खड्डा असल्याचे सांगण्यात येते. त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. सावंगी संगमावर नागरिक मोठ्या प्रमाणात देवकार्यासाठी जातात. मात्र या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने असे अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two youths who had gone down to bathe in the wardha river for devotional service were swept away by the river current success in saving one nrp 78 ssb