नागपूर : काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचा नामनिर्देशन पत्र जात प्रमाणपत्रामुळे रद्द झाले आहे. सर्वकाही माहीत असतानाही पक्षातील महिलेची बदनामी करत त्यांना उमेदवारी देणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली.
आपला उमेदवार रद्द होणार आहे, असे माहीत असतानाही काँग्रेसच्या नेत्यांनी रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून एका महिलेचा अपमान करण्यात आला आहे आणि खापर मात्र महायुतीवर फोडल्या जात आहे, असेही उदय सामंत म्हणाले. पर्यायी एबी फॉर्म तयार होता म्हणजेच याची काँग्रेसच्या नेत्यांना जाणीव होती. काँग्रेसचाच हा कुटील डाव होता, असा आरोपही सामंत यांनी केला. रामटेक मतदार संघातून महायुतीचा उमेदवार निवडून येईल. यासाठी महायुतीचे नेते संपूर्ण ताकद लावत असून सर्व सक्रिय आहेत. महायुतीमध्ये कोणी नाराज नाही मात्र महायुतीला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. राजू पारवे हे लोकसभेत जातील. विदर्भातील दहाही जागा महायुतीच जिंकेल, यात शंका नाही, असे सामंत म्हणाले.
यवतमाळातील उमेदवारीबाबत काय म्हणाले सामंत?
यवतमाळ मतदार संघामध्ये उद्या शिवसेनेचा उमेदवार नामांकन अर्ज दाखल करेल. शिवसैनिक म्हणून उमेदवारी मिळाली तर लढेल, असे संजय राठोड सांगत आहेत. मात्र तिन्ही नेते फॉर्म्युला ठरवतील. तिन्ही नेत्यांना कोण कुठे निवडून येईल हा अंदाज आहे, असेही सामंत म्हणाले. १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला महायुतीचे सर्व नेते उपस्थित असतील, असे सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा…ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात
कृपाल तुमानेंना मोठी जबाबदारी!
भविष्यात कृपाल तुमाने यांना मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. ते नाराज नाहीत. गद्दारीची भाषा करणारेच खरे गद्दार आहेत, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. हेमंत गोडसे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत. उलट ठाकरे गटाचे आठ आमदार माझ्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देणार आहे, असा गौप्यस्फोटही सामंत यांनी केला.