नितीन पखाले
यवतमाळ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि मारलेल्या टोमण्यांचा अर्थ कोणालाही कळत नाही, अशी बोचरी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. आज यवतमाळ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काही अभिनेत्यांनी केलेल्या एका पानमसाल्याच्या जाहिरातीचा उल्लेख करत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर ‘कमळापसंद’ म्हणत उपहासात्मक टीका केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंच्या टीकेचा अर्थ कोणालाही कळत नाही, अशी टीपणी सामंत यांनी केली. त्यांचे टीका-टोमणे केवळ त्यांनाच कळतात, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपद गेल्याने उद्धव ठाकरेंचा आक्रस्ताळेपणा सुरू आहे. महाराष्ट्रात यापूर्वी वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, अशोक चव्हाण आदींचे मुख्यमंत्रीपद विविध कारणांनी अचानक गेले. मात्र उद्धव ठाकरेंसारखा आक्रस्ताळेपणा आणि थयथयाट कोणी केला नाही, असे उदय सामंत म्हणाले. पद आणि सत्ता गेल्याने ठाकरे बैचन असून त्यामुळे ते कोणावरही टीका करत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
आणखी वाचा-उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात, ‘जिल्ह्यातील बेरोजगारांना मुख्यमंत्री देणार…’
मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाश्वत मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे म्हणजे मराठा आरक्षण देणारच असे, उदय सामंत म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली असली तरी शासनाला तशी गरज भासल्यास विशेष अधिवेशन बोलावू, असे सामंत यांनी सांगितले.
मुंबईतील हिरे व्यापार कुठेही जाणार नाही
मुंबईतील हजारो कोटींची उलाढाल असलेला हिरे व्यापार गुजरातला पळवून नेला जात असल्याचा आरोप उद्योगमंत्री सामंत यांनी फेटाळून लावला. हे आरोप विरोधक पोटशूळ उठल्यामुळे करत असल्याची टीका सामंत यांनी केली. येथील हिरे व्यापार कुठेही नेला जाणार नाही. उलट नवी मुंबईमध्ये देशातील पहिला व सर्वांत मोठा ‘डायमंड हब’ निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.