नागपूर: आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार राजन साळवी यांच्याबाबतही आमदार किरण सामंत यांनी मोठा दावा केला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य केले होते. नागपुरात आजपासून सुरू झालेल्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनाला ते आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ‘मिशन टायगर’ होणारच असे ठामपणे सांगितले.
उदय सामंत म्हणाले की, मिशन हे सांगून राबवले जात नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम केले त्याकरिता आता मिशन राबवण्याची गरज नाही. आता काही लोकांना कळून चुकले की, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे पण निश्चित आहे.
बारा आमदार संपर्कात
मी ९० दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या सेनेसह आघाडीचे १० ते १२ माजी आमदारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असे सांगितले होते. माझ्या या विधानावर मी आजही ठाम आहे. त्यांना कळून चुकले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांचा पक्ष संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार चांगले मित्र पण..
विजय वडेट्टीवार माझे राजकारणाच्या पलिकडे जाऊन चांगले मित्र आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे लोक चांगले नाहीत. त्यांनी त्यांच्या पक्षात प्रदेशाध्यक्षपदा संदर्भात जे वाद सुरू आहे हे अगोदर सोडवले पाहिजे. उदय सामंत सोबत किती आमदाराने आमच्या पक्षात काय चाललंय हे पाहू नये. मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारणात आलो आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कोणताही त्रास होईल अशी कृती आमच्याकडून होणार नाही. आम्ही बालिश नाही. त्यामुळे बालिश राजकारण कोणी करू नये. न्यायालयात एखादी बाब चालू असताना त्यावर बाहेर भाष्य आणि ट्विट करणे योग्य नाही. न्यायिक व्यवस्थेवर कायम आक्षेप घेणे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेणे ही काही लोकांची फॅशन बनली आहे. त्यावर मला जास्त बोलायचे नाही.
लाडकी बहीण योजना
लाडली बहिण योजना बंद होणार किंवा अनेक महिलांची नावे वगळली जाणार अशा अफवांवर उदय सामंत म्हणाले की, या योजनेत जे काही नियम दिले गेले आहेत त्यामुळे काही नावांमध्ये घट झाली आहे. अनावधानाने किंवा नजरचुकीने आलेल्या महिला भगिनींची नावे कमी झाली आहेत. सरसकट लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असेही सामंत म्हणाले.