नागपूर : कोणी कोणाला संपवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांची कर्म त्यांना संपवत असतात. उद्धव ठाकरे यांची ज्या पद्धतीची कार्यप्रणाली होती, त्यामुळे एकनाथ शिंदेंसह आम्ही सगळ्यांनी उठाव केला. ज्यावेळी आपण संपत असतो तेव्हा कोणावर तरी खापर फोडायचे असते. त्यासाठीच त्यांची उठाठेव सुरू आहे, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यांनी केली.
उदय सामंत नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांची पत्रकार परिषद आता कोणीच फारशी गंभीरतेने घेत नाही. ३५ जागा निवडून येतील असे ते म्हणाले होते. महाराष्ट्रात नाही तर देशात ३५ जागा निवडून येईल असा त्याचा अर्थ होतो. त्यांची भाषा वापरण्याची पद्धत एखाद्या टपोरी मुलासारखी आहे. त्यांच्या सोबत असलेले लोक त्यांच्या बोलण्याला गांभीरपणे घेत नाही, त्यामुळे तुम्हीही घेऊ नका. त्यांनी तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा चार जूनपर्यंत थांबावे. चित्र स्पष्ट होईल. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होणार आहेत.
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटलो आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर चर्चा केली नाही असे होत नाही. विदर्भातील महायुतीच्या जागेसंदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना भेटून सिंधुदुर्गचा प्रश्न सुटणार नाही तर ते स्वत: हा प्रश्न सोडवतील असेही सामंत म्हणाले.
हेही वाचा…गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होत असला तरी यावर बोलण्या इतका मी मोठा नेता नाही. जो काही निर्णय होईल तो महायुतीत होईल. भावना गवळी यांची पत्रकार परिषद नाराजीसाठी नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी भेट घेतली आहे. त्यांनाही मानाचे स्थान भविष्यात दिले जाईल. त्यांची पत्रकार परिषद ही महायुतीला ताकद देण्यासाठी आहे, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.