लोकसत्ता टीम
अमरावती : काही पक्षांच्या ज्या चांगल्या गोष्टी असतात, त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत. वाईट गोष्टी घ्या, असे मी म्हणत नाही. गेल्या काही दिवसांतील राजकारण आपण पाहिले, समोरील दोन पक्ष आपसात भांडताहेत.
जेव्हा स्वत:च्या नेत्यावर आगपाखड झाली, सुपारी फेकली गेली, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये झालेला उद्रेक हा महाराष्ट्राने बघितला आहे. महायुतीची ताकद ही त्यांच्यापेक्षा निश्चितपणे जास्त आहे, पण आपल्या नेत्यांवर टीका झाल्यानंतर आपण कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो, याचे आत्मचिंतन आपण करणे गरजेचे आहे, असा सल्ला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत बोलताना दिला. उदय सामंत यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे नाव न घेता, त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
आणखी वाचा-सुप्रिया सुळेंना मुनगंटीवारांचा टोला, म्हणाले “माविआ सरकार होतं तेव्हा..”
महायुतीच्या अमरावती विभागीय समन्वय बैठकीत ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह पसरवून महाविकास आघाडीने जनतेची दिशाभूल केली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या रूपाने संधी चालून आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी संघटित होऊन विरोधकांकडून समाज माध्यमांद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांना सडेतोड उत्तर द्यावे, असे नमूद करताना राज्यात एका पक्षाच्या नेत्यावर टीका झाली तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर रान पेटवले.
त्या पक्षापेक्षा आपली ताकद अधिक आहे. आपणही आपल्या नेत्यावर टीका केली तर महाराष्ट्र कसा पेटवू शकतो हे दाखवून देण्याची गरज आहे, असे आवाहन सामंत यांनी मनसेचे नाव न घेता उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. उदय सामंत म्हणाले, राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत लोकहिताच्या असंख्य योजना हाती घेतल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा केवळ १ लाख मते कमी मिळाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यशस्वी ठरणार असून महायुतीचा जनाधार त्यामुळे वाढणार आहे.
आणखी वाचा-वडिलांचे निधन, आई अंथरूणावर, बहीण-भावाच्या जिद्दीची अशीही कहाणी…
विधानसभा निवडणुकीत संघटित होऊन एकजुटीने लढण्यासाठी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांप्रमाणेच कार्यकर्ते देखील आपापसातील मतभेद, मनभेद विसरून एकत्र आल्यास विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशेच्या वर जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा उदय सामंत यांनी केला.
या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे खासदार अनुप धोत्रे, भाजपचे आमदार प्रसाद लाड, योगेश टिळेकर, संजय कुटे, रणधीर सावरकर, प्रवीण पोटे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिकेत तटकरे, संजय खोडके यांच्यासह पश्चिम विदर्भातील महायुतीच्या घटक पक्षातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.