वर्धा : अवघा चार महिन्यांचा असताना अपघातात मातृछञ हरविले. वडिलांनी दुसरे लग्न केले. आबाळ होवू नये म्हणून काकाने सांभाळले. परिस्थिती बेताची म्हणून शिक्षकांनी हातभार लावला. राष्ट्रभक्तीचे धडे दिले. आज वीस ऑगस्टला तो सैन्यात सेवा देण्यास रवाना झाला. देवळी तालुक्यातील आंबोडा या गावतल्या उदय वासुदेव खडास्कर याची ही वाटचाल प्रेरणा देणारीच.
गावातील शाळेत मिळालेले संस्कार ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी, असे तो म्हणतो. सैन्यात रुजू होण्यापूर्वी त्याचा शाळेने सत्कार केला तेव्हा त्याचे कातर स्वर गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरले. याच शाळेने घडविले. या शाळा जिवंत ठेवणे आवश्यक आहेत. अन्यथा माझ्यासारखी मुलं घडू शकणार नाहीत.
हेही वाचा – NAG PANCHAMI 2023 : उद्या नागपंचमी; जाणून घ्या महत्त्व, इतिहास; काय आहे वर्ज्य?
कॉन्व्हेन्ट शाळा आमच्या सारख्या साधारण कुटुंबासाठी नाही. माझ्यात पोरकेपणाची भावना राहू नये म्हणून इथल्या शिक्षकांनी माया लावत जिद्द, चिकाटी शिकवली. त्यांचे ऋण विसरू शकत नाही, असे बोल उदय व्यक्त करतो. मुख्याध्यापक किशोर वानखेडे यांनी टेबल, खुर्ची, बेंच, पुस्तके या सोबतच दिलेले संस्काराचे धडे तो आवर्जून नमूद करतो. काका वसंतराव खडस्कार यांनी केलेले संगोपन तो आठवितो. गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या निरोप समारंभात गाव लोटले होते.
हेही वाचा – वर्धा जिल्ह्यात संततधार; धरणातून विसर्ग सुरू, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा
सरपंच चंद्रशेखर ठाकरे, व्यवस्थापन समितीचे मनोहर मंगेकर, केंद्रप्रमुख संजय बैस यांनी मनोगत मांडताना उदयची प्रशंसा केली. समाजसेवी गजानन केमेकर, उमेश जगताप, उपसरपंच भारती मुते, पोलीस पाटील अमोल झाडे, तंटामुक्तीचे साटोने, ग्रा. पं. सदस्य ढगे तसेच शिक्षकगण प्रफुल्ल देशमुख, सचिन खडसे, सुभाष मरघडे यांची हजेरी होती. उदय आज राजस्थान येथील पोखरणच्या भागात कर्तव्यस्थळी रवाना होणार.