नागपूर : लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील हे वयाने वडीलधारी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे माझ्यासमोर त्यांचे आव्हान आहे असे म्हणणार नाही. मोदीजींनी देशात विकास केला आहे त्यामुळे मी भाजपकडूनच लढणार असल्याचे खासदार उदयनराजे यांनी स्पष्ट केले.
खासदार उदयनराजे भोसले नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्याला मी अपवाद नाही. पक्षाने तिकीट दिल्यास मी पण उभा राहील. सर्वांच्या नसा नसात शिवाजी महाराज आहेत. महाराजांचे जे विचार होते त्याच विचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशात काम करीत आहे. लोक कल्याणाचा विचार महाराजांचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असेही उदयनराजे म्हणाले.
हेही वाचा – शिक्षक भरती : दलाल, मध्यस्थ सक्रिय; ‘ही’ घ्या काळजी…
हेही वाचा – बावनकुळे म्हणतात, “कुणी सोबत येत असेल तर भाजपचा दुपट्टा तयार, राहुल गांधी…”
मोदीजी आणि त्याचे सहकरी यांनी विकास पोहोचवला आहे. महाराष्ट्रात आणि देशभरात विकास पाहायला मिळत आहे, त्यामुळे भाजपशिवाय दुसरा विचार करणार नाही. त्या काळात मंडळ आयोगातून चूक झाली. आरक्षण हे फक्त मागासवर्गाला न देता कुठल्याही जाती धर्मातील व्यक्ती असू दे, आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही त्यांना मदत करणे आणि तो विचार आणायला हवा होता. खरंतर प्रत्येकाला वाटतं आपल्यावर अन्याय होऊ नये, मराठा समाज विचार करत आहे तसा इतर समाजसुद्धा विचार करत आहे, असेही ते म्हणाले.