नागपूर : ‘एक देश, एक निवडणूक’ प्रक्रिया पारदरर्शक असली पाहिजे, मात्र त्यासाठी निवडणूक आयुक्त हे निवडणूक प्रक्रियेतून निवडून येणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने बसवलेला निवडणूक आयुक्त आम्हाला कायदे शिकवत असेल तर ते चालणार नाही. मात्र, या सरकारमध्ये ते शक्य नाही, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले, की ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. निवडणूक आयुक्त जनतेमधून निवडला गेला पाहिजे. आपण आधी अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार बघितले. त्यानंतर या निवडणुकीचा निकाल अनाकलनीय लागला. मंत्रीपद ज्यांना मिळाले त्यापेक्षा नाराजांचे बार मोठ्याने वाजत आहेत. नवीन मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री त्यांचा परिचय करून देतात. पण, मला वाटते ही पहिली वेळ असेल मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांचा परिचय मुख्यमंत्र्यांनाच करून द्यावा लागला, अशी टीका ठाकरेंनी केली.
हेही वाचा >>>One Nation One Election : मोठी बातमी! भाजपा २० खासदारांना बजावणार नोटीस; नेमकं कारण काय?
‘लाडके आमदार, नावडते आमदार’ योजना सुरू करा
निवडणूक आटोपली आणि ईव्हीएम सरकार सत्तेवर आले. आता लाडक्या बहिणींना जाहीर केल्यानुसार २१०० रुपये द्यावे. यामध्ये नावडती आणि आवडती करू नये. या योजनेबाबत सरकारचे जे काही डाव होते ते आता उघड झाले आहेत. आता सरकारने ‘लाडके आमदार आणि नावडते आमदार’ ही योजना सुरू करावी, असा चिमटा ठाकरेंनी काढला.
गंमत म्हणून अधिवेशन घेता का?
आरे कारशेडमध्ये जशी वृक्षतोड करण्यात आली, तशी डोंगरीच्या कारशेडमधील १४०० झाडांची कत्तल केली जाणार आहे का? पर्यावरणतज्ज्ञांची समिती होऊ देणार आहे का? कायदा आणि सुरक्षेबाबत हे सरकार काय करणार? खातेवाटप झालेले नाही, ही जबाबदारी नेमकी कोणाची? गंमत म्हणून अधिवेशन घेतले जात आहे का? जर असे होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे, असे म्हणत ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले.
हेही वाचा >>>विधान परिषद सभापतीपदासाठी भाजपच्या राम शिंदेंच्या नावार शिक्कामोर्तब
बीड, परभणीवर चर्चा गरजेची
बीड आणि परभणीमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा. अजूनही या विषयावर सभागृहात चर्चा झाली नाही. नागपूर ही संत्रानगरी म्हणून ओळखली जाते. मात्र आता हे राजकीय जाहिरात फलकांचे शहर झाले आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
भुजबळ संपर्कात
छगन भुजबळ नाराज आहेत का, ते माहिती नाही. मात्र, ते अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. काही नव्याने मंत्री झाले. त्यातील अनेकांनी आधी जॅकेट घेऊन ठेवले होते. ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांच्याप्रति सहानुभूती व्यक्त करतो. मात्र, या सरकारची पुरती दैना झाली आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.