नागपूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी की युती करावी हा त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे. स्वबळावर लढण्याचे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकते, त्यामुळे कदाचित २८८ मतदारसंघांमध्ये आपल्याला उमेदवार मिळतील की नाही याची चिंता असल्यामुळे ते चाचपणी करत असतील. मात्र त्यांच्याजवळ कार्यकर्ते नसल्यामुळे आघाडीशी जुळवून घेण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदय सामंत नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांना राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी केल्यावर त्यांना त्यांचा पक्ष कुठे आहे ते कळेल असेही सामंत म्हणाले. विशालगडाच्या बाबतीत जातीपातीचे राजकारण करण्यात अर्थ नाही. अनधिकृत बांधकामामुळे झालेला तो उद्रेक होता. निवडणूक आल्या म्हणून जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण करून काही राजकीय पक्ष महाराष्ट्र भडकवण्याचे काम करत आहे, ते करू नये असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा – वर्धा : ॲडमिशन टळल्यास महाविद्यालय इतरत्र जाणार? वैद्यकीय महाविद्यालय जागेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव

आदित्य ठाकरे अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल असे म्हणत आहे. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही त्यामुळे त्यांचे सरकार येणार नाही. महायुतीचे सरकार पुन्हा येईल आणि पुन्हा पाच वर्षांत राज्याचा अधिक जोमाने विकास करु असेही सामंत म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी जो आरोप केलेला आहे. त्या अनुषंगाने विधानसभेला दोन तीन महिने आहे. कोणी कोणी महायुतीला मतदान केले आहे, याचे पडसाद विधानसभेत दिसतील. जयंत पाटील यांना मत फुटणार असे डोळ्यासमोर दिसत होते. एका चांगल्या राजकीय पक्षातील नेत्याला संपवण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या केले आहे, असा आरोप सामंत यांनी केला.

जातीपातीच्या विषयाला धरून वाद लागणे, आणि वाद लावणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. कालपर्यंत आम्ही सगळे गुन्यागोविंदाने राहत होतो. मात्र जातीपातीचे आरक्षणाच्या राजकारणावरून जे काही घडत आहे, ते योग्य वाटत नाही. मराठा समाजाला दहा टक्के टिकणारे आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आश्वासन दिले. दोन्ही समाजाला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षातील काही नेते वाद लावत आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने गंभीर बाब आहे, असेही सामंत म्हणाले. विदर्भात किती जागा लढायच्या या संदर्भात आम्ही यादी तयार केलेली आहे. हा सगळा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे.

हेही वाचा – Nagpur Crime Update: एकाच भूखंडाची दोघांना विक्री…महिलेची फसवणूक

उद्योगांमध्ये स्थानिक लोकांना रोजगार त्यांच्या जागेवर द्यावा असा कायदा नाही. मात्र, ज्या गावात व ज्या विभागात उद्योग येतात तेथील स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. तसा तो नियम आहे. आज ज्या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे तो गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक असा प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी तितक्यात महत्त्वाचा आहे. दावोस करारावर टीका होत होती. त्याला एक प्रकारचे उत्तर या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळत आहे असेही सामंत म्हणाले. गडचिरोली नक्षलवादी जिल्हा अशी ओळख असलेली पुसून उद्योग नगरी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सामंत म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray concern about getting candidate will get a candidate criticism of uday samant vmb 67 ssb
Show comments