अमित शाह यांनी चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन बंददाराआड मला आणि शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली. त्यांनी आता बंद दाराआडचे धंदे बंद करावे. हिंमत असेल तर अमित शाह यांनी मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवावी, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलतान त्यांनी भाजपावर तसेच शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“अमित शाह हे आठ दहा दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन गेले. त्याच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी मला औरंगजेब फॅन्स क्लबचा सदस्य म्हटलं. पण मला जर ते औरंगजेब फॅन्स क्लबचा सदस्य म्हणतील तर ते अहमदशाह अब्दाली आहेत. चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन त्यांनी बंददाराआड मला आणि शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली. त्यांनी आता बंद दाराआडचे धंदे बंद करावे. त्यांच्यात हिंमत असेल त्यांनी मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवावी, हे बाजारबुणगे बाहेरून येतात आणि महाराष्ट्राला गुलाम करण्याची भाषा करतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – Prakash Ambedkar : ठाकरे गटाला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील? प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, “फक्त…”

“भाजपाला अख्खा महाराष्ट्र गिळायचा आहे”

“भाजपाला अख्खा महाराष्ट्र गिळायचा आहे. त्यामुळे त्यांना शिवसेना नको आहे. त्यामुळेच त्यांना शरद पवार नको आहे. पण हा महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. जर हा महाराष्ट्र तुम्ही गिळण्याचा प्रयत्न केला, तर ही जनता तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच पुढे बोलताना, लोकसभा जिंकली, आता विधानसभा जिंकायची आहे. लोकं मेली तरी चालेल, पण भाजपाला सत्ता हवी आहे. दसरा मेळाव्यानंतर मी महाराष्ट्रात फिरणार आहे”, असेही त्यांनी सांगितलं.

“अजूनही निवडणुकीचं वातावरण तापलं नाही”

“अजूनही निवडणुकीचं वातावरण तापलं नाही. जेव्हा पेटेल तेव्हा विझलायला वेळ लागणार नाही. फटाके फोडायला दिवाळी अजून बाकी आहे. रामटेक आपण पाच वेळा जिंकलो, पण महाविकास आघाडी म्हणून कद्रूपणा करायचा नाही. बाबासाहेब केदार यांना भेटलो होतो. तेव्हा सुनील केदार अपक्ष होते. तेव्हापासून सुनील केदार आमचा सहकारी आहे. रामटेक मागितली, रामटेक दिली. शिवसैनिकांनी काम केलं”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – नागपूर विमानतळावर राडा: नितेश राणेच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक, काय झाले…….?

“रश्मी बर्वेचं प्रमाणपत्र अवैध ठरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा”

“लोकसभा निवडणुकीत रश्मीताईंचा अर्ज बाद झाला. तेव्हा सुनील केदार म्हणाले चिंता करु नका. तेव्हा प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय अवैध होता असं कोर्टाने म्हटलं. आता गुन्हेगार कोण? स्त्यावरून प्रमाणपत्र घेतो का? ज्यांनी रश्मी बर्वेचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकावं”, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.