आम्ही मोदींना राममंदिरासाठी कायदा करा, असं म्हणत होतो. पण तेव्हा मोदी त्यावर बोलायला तयार नव्हते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर टीकोजी राव फणा काढून अयोध्येला जाऊन बसले, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. नागपूरमध्ये वज्रमूठ सभेत बोलताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावरून शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“राज्यात अवकाळी पाऊस असताना शिंदे सरकार अयोध्येला गेले, मी मुख्यमंत्री असताना आम्हीही अयोध्येला गेले होतो. संजय राऊत आणि सुनील केदारही त्यावेळी माझ्याबरोबर होते. पण ती वेळ वेगळी होती. मी अयोध्येला पहिल्यांदा गेलो, तेव्हा राम मंदिराचा मुद्दा ठंड बस्त्यात होता. याची सुरुवात शिवसेनेने केली. आम्ही मोदींना राम मंदिरासाठी कायदा करा, असं म्हणत होतो. पण मोदी त्यावर बोलायला तयार नव्हते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर टिकोजी राव आता फणा काढून अयोध्येत जाऊन बसले”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“…म्हणून फडणवीसांना अयोध्येची आठवण झाली”
पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्र सोडलं. “मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसही कधी अयोध्येला गेले नव्हते. आता शिंदे अयोध्येला गेले, तेव्हा फडणवीसांना अयोध्येची आठवण झाली. राज्यात इकडे अवकाळी शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांच्य डोळ्यात अश्रू आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अयोध्येत जाऊन बसले”, असे ते म्हणाले.