नागपूर : राज्य सरकारने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. अर्थसंकल्पात घेतलेले निर्णय अंमलात येतील. मात्र उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे काहीच केले नाही. दोनदासुद्धा ते मंत्रालयात आले नाही. अथर्संकल्प त्यांना समजत नसल्याचे त्यांनी कबुल केले आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या विविध योजनांबाबतच्या निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांनी दिलेला अर्थसंकल्प हा ऐतिहासिक आहे. शेतकरी, शेतमजूर, बहिणी, तसेच सर्व घटकांसाठी उत्कृष्ट असा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे लाडली बहीण योजनेत महिलांना मोठा फायदा होणार आहे. मला अर्थसंकल्प समजत नाही असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ दोनदा मंत्रालयात आले आणि आता ते अर्थसंकल्पावर बोलायला लागले, अर्थसंकल्पाचा अर्थ समजला असता तर त्यांनी प्रतिक्रिया देताना ती अभ्यास करून दिली असती. त्यांनी केवळ विरोधक म्हणून टोमणे मारले आणि गेल्या काही दिवसांत त्यांना तेवढेच असल्यामुळे ते विरोधाकरता विरोध करतात, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
हेही वाचा – मुंबई, ठाण्यापेक्षा नागपुरात पेट्रोल, डिझेल महाग; अर्थसंकल्पातील घोषणेमुळे…
विधान परिषदेची यादी आज सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. आमच्या कोर कमिटीत १८ ते २० नावांवर चर्चा झाली नाही, काही लोक अंदाज बांधून याद्या तयार करतात आणि मात्र कोणाला संधी मिळेल याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मुंबईत विधानसभा निवडणुकीचे प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बैठक आहे. यात २१ जणांची कोर कमिटी असून त्यांची बैठक आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक आहे. महाराष्ट्रात निवडणुकीला समोर कसे जायचे याबाबतची भूमिका ठरणार आहे. १४ जुलैला पुण्यात विस्तृत राजकीय कार्यकारिणीची बैठक आहे. त्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना वेळ मागितला आहे आणि त्यांनी येण्याचे मान्य केले, त्यात निवडणुकीच्या विस्तृत कार्यक्रमावर चर्चा होईल, असेही बावनकुळे म्हणाले.
विधान परिषदेचा सभापती भाजपचा असावा. आमच्याजवळ अकरा घटक पक्ष आहे, घटक पक्ष सगळ्यांशी बसून त्याबाबत निर्णय करतील. पुढच्या दोन-तीन वर्षांत शेतकऱ्यांना मोफत वीज देणे शक्य आहे. सबसिडी देण्याऐवजी सोलर प्रकल्प उभे केले तर मोफत वीज देता येऊ शकते. मोफत वीज दिली तर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि राज्याचा जीडीपी वाढेल असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – अर्थसंकल्पावरील उद्धव ठाकरेंच्या टिकेवर बोलताना फडणवीस म्हणाले…
विधान परिषदेत उमेदवारी देताना तेथील भौगोलिक परिस्थिती, त्या भागातील प्रादेशिक समतोल, सामाजिक समीकरण या सर्व गोष्टींचा विचार करून कर्तुत्ववान व्यक्तीला उमेदवारी देणार. त्या ठिकाणी कायदे मंजूर करण्यासाठी अनुभव असलेल्या सामाजिक न्याय मागण्याकरता प्रबळ असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल. मात्र शेवटी केंद्रीय संसदीय मंडळ त्यावर निर्णय करेल, असेही बावनकुळे म्हणाले.