नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत हजेरी लावली आहे. सीमावादाच्या मुद्य्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेल्यावरूनही नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “जसं कर्नाटक सरकारने ठराव मांडला आहे की, एक इंच सुद्धा जागा महाराष्ट्राल देणार नाही. एवढी आपल्यात धमक आहे का? खरंतर आज हा प्रश्न सुटायला जेवढी पुरक परिस्थिती आहे, तेवढी यापूर्वी असेल पण सोडवला गेला नाही. ती का आहे, कारण कर्नाटक, महराष्ट्र आणि दिल्लीत एका पक्षाचं सरकार आहे. दोन्ही मुख्यमंत्री पंतप्रधान, गृहमंत्र्यांना आपला नेता मानतात. आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत खरंतर त्यांनी महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून आज दिल्लीत जाण्याची गरज नव्हती. पण ते दिल्लीत गेले आहेत. दिल्लीत गेल्यानंतर या विषयावर ते बोलणार आहेत का? मग गृहमंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली, दोन्ही मुख्यमंत्री एकत्र आले आणि सर्वोच्च न्यायालयात हा खटला जोपर्यंत प्रलंबित आहे. तोपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवायची. ही परिस्थिती कोणी बिघडवली आहे?”
याचबरोबर “कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर एकएक पावलं पुढे कोण टाकत गेलं आहे. महाराष्ट्र टाकत गेलं आहे का? कर्नाटक टाकत गेलं आहे. जर मी चुकत नसेल तर सर्वोच्च न्यायालयात ही केस गेल्यानंतर कर्नाटकाने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आणि बेळगावचं नामांतर केलं गेलं आहे. मराठी भाषिकांवर अत्याचार केले गेलेले आहेत.” असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.