Buldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, बसमधील आठ प्रवशांचा जीव बचावला आहे. अपघातावर विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी शोक व्यक्त केली आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्ष भरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आतापर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Buldhana Bus Accident : “…अन् ते लहान मूल होरपळलेलं पाहून अंगावर शहारे आले,” प्रत्यक्षदर्शीने सांगितला अनुभव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सिंदखेडराजा, जि. बुलढाणा परिसरात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटली. या अपघातात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
“या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा ही विनंती,” असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray expresses grief buldhana bus accident 25 passenger died samruddhi mahamarg ssa