बुलढाणा : लोकसभा निवडणुकीत अनुकूल वातावरण असतानाही झालेला पराभव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पक्षाचे जिल्ह्यातील अस्तित्व धोक्यात आले असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे यांनी पुन्हा बुलढाणा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सोमवारी त्यांनी मुंबईत घेतलेली बैठक नवीन धोरणाचाच भाग मानली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मातोश्री’मध्ये पार पडलेल्या बैठकीला बुलढाणा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्क प्रमुख छगन मेहेत्रे, राजू मुळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, मेहकर मतदारसंघातील इच्छुक सिद्धार्थ खरात, जिल्हा संघटक गोपाल बच्छिरे उपस्थित होते. याशिवाय बुलढाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा मतदारसंघांतील उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

हेही वाचा – सांगलीतील संघर्ष मुद्द्यांवरून गुद्द्यांवर !

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विद्यमान दोन आमदार आणि खासदार यांनी ठाकरेंची साथ सोडली. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. त्यातच लोकसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल असतानाही झालेला पराभव ठाकरेंच्या जिव्हारी लागला. त्यामुळे महाविकास आघाडीत आपल्या जागा आणि त्यावरील उमेदवार, यासंदर्भात ठाकरे स्वतः लक्ष घालून आहेत. जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर आणि सिंदखेड राजा या तीन मतदारसंघांची ठाकरे गटाने मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर या तीनही मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा – शरद पवार यांचे लक्ष आता पिंपरी-चिंचवडमध्ये

मतदारसंघातील स्थिती, पक्षाची ताकद, इच्छुक उमेदवार यावर बैठकीत खलबते झाली. काँग्रेसने दावा केलेल्या बुलढाणा मतदारसंघावर जास्त चर्चा झाल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. जिल्हाप्रमुख बुधवत हेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड करीत आहेत. यामुळे बुलढाण्यावर तपशीलवार चर्चा झाली. एवढेच नाही, तर ठाकरे यांनी बुधवत यांच्या समवेत स्वतंत्र चर्चा केल्याचेही सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीतील कटू अनुभव लक्षात घेता ठाकरे दक्षता आणि सर्वंकष विचार करून उमेदवार निवडणार, अशी चिन्हे आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray group active to achieve success in buldhana print politics news ssb