एकीकडे पोलीस भरतीत अनेक गरीब मुलींचे जात पडताळणी प्रमाणपत्र प्रलंबित असताना त्यांना संधी नाकारली जाते आणि त्याचवेळी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदार संघात नवनीत राणा या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडून लढवून आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. या प्रकरणावर खासदार नवनीत राणा का बोलत नाहीत?, या प्रकरणाचा धडाक्याने निकाल का लागत नाही?’, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
शुक्रवारी रात्री बडनेरा येथील ‘शिवगर्जना’ सभेत सुषमा अंधारे यांनी संपूर्ण भाषणात नवनीत राणा यांचा ‘नवनीत अक्का’ असा उल्लेख करीत त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ‘ राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा या संधीसाधू आहेत. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘बच्चा’ संबोधणाऱ्या, त्यांच्यावर वाट्टेल ते तोंडसुख घेणाऱ्या नवनीत राणा या आता नरेंद्र मोदी यांच्यावर निष्ठा दर्शवण्यासाठी लाचारपणे फिरताहेत. राणा दाम्पत्य काय नौटंकी करतात, हे सर्वांना माहित आहे. अमरावतीच्या विकासाच्या कामाकडे लक्ष देण्याऐवजी त्यांनी कायम वेगळ्या मुद्यांवर चर्चेत राहण्यात धन्यता मानली.’
हेही वाचा >>> “अतिरिक्त ‘वर्कलोड’मुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस कूचकामी”, सुषमा अंधारेंचं विधान; म्हणाल्या, “बच्चू कडूंना…”
नवनीत राणा यांनी सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. त्यावर सुषमा ठाकरे म्हणाल्या, ‘ उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, असे नवनीत राणा म्हणतात. पण, ज्यांच्यामुळे गेली सात महिने चाळीस गद्दार, भाजपाचे १०५ आमदार, तीन राज्यातील यंत्रणा सुरतपासून गुवाहाटीपर्यंत कामाला लागल्या, त्यांचे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.’
सुषमा अंधारे यांनी हनुमान चालिसा प्रकरणावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘ आपण शेजाऱ्याच्या घरी चहा प्यायला देखील बोलावल्याशिवाय जात नाही. इथे तर राणा दाम्पत्य थेट तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टाहास का करीत होत्या? रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून तर हे नाटक नव्हते?, नवनीत राणा यांच्या हाताने देवेंद्र फडणवीस हे आपला ‘गेम’ करीत आहेत, हे आपण बच्चू कडू यांना सांगितले होते, पण त्यांनी ऐकले नाही. ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा चक्रवाढ व्याजासहित हिशेब घेतला जाईल’.
हेही वाचा >>> “शिंदेच्या बंडामागचे खरे सूत्रधार फडणवीसच”; खासदार खैरे यांचा आरोप
भाजपा स्वायत्त यंत्रणांच्या मदतीने कारस्थाने करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदार, खासदार गेले, पण निष्ठावान शिवसैनिक हे आमच्या बरोबर आहेत.
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे कळसूत्री बाहुले बनले आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. सभेला ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, श्याम देशमुख, प्रिती बंड, महानगर प्रमुख पराग गुडधे, नाना नागमोते, सागर देशमुख, राहुल माटोडे आदी उपस्थित होते.