लोकसत्ता टीम

यवतमाळ : गेल्या दोन आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्ह्यात तीन सभा झाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उबाठा)ने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यात एक प्रकारे आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीतील उमेदवारीचा घोळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहचूनही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधून ‘इतना सन्नाटा क्यों है भाई’ पद्धतीचे संवाद ऐकू येत आहे.

यवतमाळ जिल्हा तीन लोकसभा मतदारसंघात विभागाला गेला आहे. त्यापैकी केवळ चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजप (महायुती)ने सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर केली. यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींकडून अद्याप उमेदवाराबाबत अंतिम निर्णय झाला नाही. यवतमाळ-वाशिमच्या उमेदवारीवरून दिल्ली, मुंबईत जोरदार ओढाताण सुरू आहे. यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिंदे गटाला जाणार आहे. यवतमाळ-वाशिममध्ये भाजपने विद्यमानऐवजी अन्य उमेदवार देण्याची अट घातली आहे. त्यामुळे महायुतीतील उमेदवारीचा गुंता अद्याप सुटलेला नाही. मंत्री संजय राठोड यांचेही नाव शिंदे गटाकडून चर्चेत आहे. मात्र, त्यांनी लोकसभा लढविण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे संजय राठोड यांनी आपल्याऐवजी अन्य दोन नावे मुख्यमंत्री शिंदेकडे दिल्याचे सांगण्यात येते. महायुतीत संजय राठोड ज्यांच्या बाजूने उभे राहतील, तो उमेदवार निवडून येईल, असा संदेश सर्वेक्षणातून दिल्लीत पोहोचल्याने संजय राठोड अन्यथा राठोड ज्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतील तो उमेदवार द्यावा, असे ठरल्याचे सांगण्यात येते. या खलबतानंतर विद्यमान खासदार भावना गवळी या आज मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. यवतमाळ-वाशिमची महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास भावना गवळी यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- नागपूरच्या मेट्रो स्थानकावर सुरक्षा रक्षकाला मारहाण, ‘हे’ आहे कारण

महाविकास आघाडीनेही यवतमाळ-वाशिममध्ये अद्याप ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसते. महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे संजय देशमुख उमेदवारी दाखल करतील हे निश्चित मानले जात आहे. मात्र महायुतीचा उमेदवार घोषित झाल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा शिवसेनेकडून केली जाईल, असे सांगण्यात येते. येथे उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांची जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेवून महाविकास आघाडी व शिवसेना उबाठाप्रती मतदारांमध्ये वातावरण निर्मिती केली आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला नागरिकांचाही उत्फूांर्त प्रतिसाद मिळत असल्याने महायुतीनेही या मतदारसंघात विजयाची हमखास ‘ग्यारंटी’ असलेलाच उमेदवार देण्यावर भर दिला आहे. यवतमाळ-वाशिमच्या उमेदवारीबाबत भाजपचा रोष नको म्हणत शिवसेना शिंदे गटाने सावध पावले उचचली आहेत. येत्या दोन दिवसात येथील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेल असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader