अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताकाळात कधीही घराबाहेर पाऊल ठेवले नाही. खिशाला पेन लावला नाही. आता गेल्या दहा महिन्यांत सत्ता नसताना शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नावर कधीही मोर्चा काढल्याचे आठवत नाही. त्यांनी २५ वर्षे मुंबईला लुटले, आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी ‘एसआयटी’मार्फत होणार असल्याने उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत, म्हणून ते येत्या १ जुलैला ते मोर्चा काढत आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केली.
बुधवारी रात्री येथील नेहरू मैदानावर आयोजित भाजपाच्या महाजनसंपर्क सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा – मान्सूनने यंदा त्याचा मार्ग बदलला, विदर्भात प्रवेशासाठी निवडला वाघांचा जिल्हा
प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबई महापालिकेत करोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आपल्या मागे चौकशीचा ससेमिरा लागेल, म्हणून उद्धव ठाकरे विचलित झाले आहेत. येत्या १ जुलैला मुंबईत मोर्चा काढण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पण, मोर्चाचे हे ढोंग आहे. मुंबई महापालिकेत काय-काय लुटले हे चौकशीतून बाहेर येणार आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी मोर्चा काढा किंवा काहीही करा, मुंबई महापालिकेतील पैशा अन् पैशाचा हिशेब घेतला जाईल, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.
हेही वाचा – नागपूर: नवरी निघाली चार महिन्यांची गर्भवती; नवरदेवाने डोक्यावर हात मारून घेतला अन् …
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेमुळे विरोधकांची ‘हवा गुल’ झाली आहे. सर्व विरोधक एकत्र येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांनी कितीही आक्रमण केले, तरी आम्ही त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहोत, असे दरेकर म्हणाले.