यवतमाळ : सध्याचा काळ हा जनतेसाठी, देशासाठी आणि संविधानासाठी खडतर आहे. पण, भविष्याचा मार्ग सुखकर करायचा असेल, तर एकजुटीची लढाई लढावी लागणार आहे. जनतेच्या विश्वासावर लुटारूंच्या विरुद्ध मैदानात उतरलो आहे. राज्य सरकारची अवस्था ‘दोन फुल, एक हाफ’ आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सोमवारी राळेगाव येथील ‘जनसंवाद’ सभेत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्ते किशोर तिवारी, संजय देशमुख संतोष ढवळे, प्रवीण पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, सध्याचे राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना कधीच न्याय देऊ शकणार नाही, यवतमाळ-वाशिमच्या खासदारांना ज्या जनतेने निवडून दिले त्यांनी केवळ शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही, तर मतदारांशीही गद्दारी केली आहे. इथल्या खासदार ज्या भ्रष्टाचारी असल्याचे भाजपवाले सांगत होते, त्यांनी मोदींना राखी बांधली. मग त्या प्रामाणिक आहेत का, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे भाजपला आव्हान, संघर्ष हाणामारीपर्यंत

याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मोदी यांनी जुमल्याचे नावच मोदी की गॅरंटी असे ठेवल्याचा टोला त्यांना हाणला. मोदींना वाटतं, यवतमाळमध्ये सभा घेतली तर जिंकतो. पण ते आता शक्य नाही. जनतेचे नशीब मोदींच्या हातात नसून, त्यांचे नशीब तुमच्या हातात आहे, असे ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, पण आता लागवडीचा आणि उत्पादन खर्च दुपटीपेक्षा वाढला आहे. तरीही हमीभाव देत नाहीत. मला शेतीतले फार कळत नाही, मला फक्त शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात आणि ते पुसायचे आहेत. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव कसा मिळेल, याबाबत मी योजना आणत होतो, पण गद्दारांनी सरकार पाडले, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “संजय राऊत खोटे बोलताहेत,” प्रकाश आंबेडकर यांचे विधान; म्हणाले, “आधी भांडणे मिटवावीत…”

हेही वाचा – “चिंता करू नका, तुमचंच नाव फायनल होणार,” आघाडी, युतीच्या उमेदवारांना पक्षनेतृत्वाचे आश्वासन; संभ्रम वाढला !

दाभडीचे शेतकरी जेव्हा मोदींना भेटायला गेले तेव्हा त्यांना मोदींनी भेट नाकारली. मी देशातील अशा लुटारूंच्या, हुकूमशहांच्या विरोधात मैदानात उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते माजी मंत्री वसंत पुरके, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर आदी उपस्थित होते. सभेला महिला-पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. उन्हाची तीव्रता असतानाही नागरिकांची गर्दी लक्ष वेधून घेत होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray meeting at yavatmal uddhav thackeray criticized pm modi nrp 78 ssb