आम्ही कट्टर शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाईक आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू, असा निर्धार व्यक्त करीत नागपूरच्या शिवसैनिकांनी येथील सेनाभवनापुढे ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
सेनेचे पश्चिम नागपूर महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी एक वाजता शेकडो शिवसैनिक रेशीमबागमधील शिवसेना भवनात एकत्र जमले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. गुवाहाटीमध्ये गेलेले सेनेचे आमदार अजूनही शिवसैनिक आहेत. त्यांनी पक्ष सोडला नाही.
पक्षांतर्गत मतभेद आम्ही लवकरच सोडवू आणि पुन्हा शिवसेना खंबीरपणे एकजुटीने उभी राहील, असे कुमेरिया म्हणाले. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, हे दर्शवण्यासाठी आम्ही एकत्र आलो, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावेळी शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी गैरहजर होते. पक्षावर संकट आले असतानाही नागपुरात सेना पदाधिकाऱ्यांधील वाद संपला नसल्याचे दिसून आले.