नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक वर्षापूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची दोन गटांत विभागणी झाली. आता राष्ट्रवादीत फूट पडली. यामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. या परिस्थितीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार, असे ठाकरेंनी जाहीर केले होते. त्याची सुरुवात विदर्भातून होत आहे. त्यामुळे या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – शिवसेनेनंतर राष्ट्रवादीलाही २५ व्या वर्षात फुटीचा शाप

९ व १० जुलै, असे दोन दिवस ठाकरे विदर्भातील शिवसेनेचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना भेट देणार आहेत. कार्यकर्ते व नेते यांची भेट घेऊन त्यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.

पश्चिम विदर्भात बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम या दोन लोकसभा मतदारसंघात एकसंघ शिवसेनेचे दोन खासदार (भावना गवळी आणि प्रतापराव जाधव) होते. ते दोघेही शिंदे गटात गेले आहे. दोन आमदार शिंदे गटाकडे तर एक ठाकरे गटासोबत आहे. त्यामुळे पक्ष मजबुतीचे मोठे आव्हान ठाकरे गटाच्या शिवसेनेपुढे आहे. महाविकास आघाडी एकसंघ राहिली असती तर भाजप-शिंदे गटापुढे एकत्रित आव्हान उभे करण्यात आघाडीला यश आले असते. पण राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्याचा परिणाम शिवसेनेवरही होऊ शकतो ही बाब विचारात घेऊनच ठाकरे यांनी आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तसे आदेशही त्यांनी त्यांच्या पक्षातील आमदार, खासदारांना दिले आहेत.

हेही वाचा – ‘राज्यपालांनी राजकारणावर बोलू नये’, भाजपा नेत्याचा आरएन रवी यांना घरचा आहेर

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध पोहरादेवी मंदिरालाही भेट देणार आहेत. हा भाग शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्याबाजूने असलेला बंजारा समाज पुन्हा आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न ठाकरे यांनी यापूर्वीच सुरू केले आहेत. या दौऱ्यात ते यासंदर्भात आढावा घेऊन पावले उचलण्याची शक्यता आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. तेथून ते वाशीम जिल्ह्यात जाणार असून तेथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर अमरावती व अकोला जिल्ह्याला भेट देणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवसेनेकडे होता. तेथील माजी खासदार आनंदराव अडसुळही शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे वरील दोन्ही लोकसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत करून ठाकरेंच्या दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. त्यात राहायचे की बाहेर पडायचे याचीही चाचपणी ठाकरे यानिमित्ताने करण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटात गेलेल्या पक्षाच्या आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचाही प्रयत्न या दौऱ्यात होऊ शकतो. एकूणच पश्चिम विदर्भात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray to visit vidarbha for two days from sunday for party building print politics news ssb
Show comments