लोकसत्ता टीम
नागपूर : सावनेर विधानसभा मतदारसंघातील आणि कळमेश्वर नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावारण २९ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून ते जिल्हात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
नागपुरातील प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनिल केदार यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते सागर डबरासे, उत्तम कापसे, प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरीया, देवेंद्र गोडबोले, सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. घनश्याम मक्कासरे उपस्थित होते.
आणखी वाचा-विजेचा धक्का लागल्याने अपघात, नुकसान भरपाईसाठी स्पष्ट नियमावली तयार करा; उच्च न्यायालयात याचिका
सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था, कळमेश्वरच्या वतीने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला गेला आहे. जमिनीपासून २५ फुट उंच राहणाऱ्या पुतळ्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेची असेल. २०१६ पासून या पुतळ्याचा स्थापनेचा ठराव घेऊन त्यादिशेने प्रयत्न झाले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये मार्गदर्शक तत्व निश्चित करून त्यानुसार पुतळ्याची स्थापनेचे आदेश दिले होते. त्यात चॅरीटेबल ट्रस्टच पुतळा स्थापन करेल, असे नमुद होते. त्यानुसार सर्व परवानग्या तसेच वास्तुशास्त्र नियमांचे पालन करून सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्थाद्वारे पुतळ्याचे काम पूर्ण झाले. सुनील केदार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत आहे. या पुतळ्यासाठी सतत दोन वर्षे पाठपुरावा केला होता. आता पुतळ्याच्या अनावरणामुळे नवीन पिढीला छत्रपतींच्या कामाची माहिती होऊन चांगल्या कामाची प्रेरणा मिळेल.
आणखी वाचा-उच्च न्यायालयही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाचवू शकले नाही, सीईटी सेलची आडमूठी भूमिका…
लोकसभा निवडणूकीपूर्वीच या कार्यक्रमाचे नियोजन होते. त्यानुसार राज्याचे नेतृत्व केलेल्या व बोले तैसे चाले असे चारित्र असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार होता. परंतु विविध कारणांनी ते शक्य झाले नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमातून महाविकास आघाडीच्या वतीने पुढच्या निवडणूकीचे रणशिंगही फुकले जाण्याचे संकेत केदार यांनी दिले. देवेंद्र गोडबोले म्हणाले, कार्यक्रमाला शिवसेवा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे, मिलींद नार्वेकर, माजी मंत्री सुनिल केदार, माजी खासदार प्रकाश जाधव, बाळाभाऊ राऊत, हर्षल काकडे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित राहतील.