लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगलीच्या जागेबाबत चर्चा सुरु आहे. आघाडीत वाटाघाटी सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. आघाडीत एखाद्या जागेची चर्चा सुरू असताना एकतर्फी नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले असून ते योग्य नाही, असे मत व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

नाना पटोले नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या बैठकीत काही जागांबाबत चर्चा सुरू असून त्या चर्चेनंतर जाहीर केल्या जाणार आहेत. सांगलीच्या जागेबाबत निर्णय झालेला नसल्याचे पटोले म्हणाले. आज लोकशाहीचे रक्षण हा मूळ प्रश्न आहे. काँग्रेसचे खाते गोठवणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. विरोधी पक्षाकडे पैसे राहू नये. आपण मात्र बाँडच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे, हा भाजपचा डाव आहे. गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्याकडून भाजपने निवडणुकीसाठी पैसे घेतले. भाजपनेही आयकर भरला नाही. मग त्यांचे खाते का गोठवले नाही. गेल्या काही वर्षात आयटी हा भाजपचा एक नवा कार्यकर्ता तयार झाला आहे. हिंमत असेल तर आयकर विभागाने भाजपचे खाते गोठवावे असेही पटोले म्हणाले.

आणखी वाचा- गडचिरोली : ‘वडेट्टीवार’ समर्थक नेत्यांचा भाजप प्रवेशाने काँग्रेमध्ये खळबळ

चंद्रपूरच्या जागेबाबत आजच्या बैठकीत स्पष्टता येईल. दोन नाव चर्चेत आहेत. यात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर आाहेत. शिवानी वडेट्टीवार की विजय वडेट्टीवार याबाबत हायकमांड निर्णय करेल. तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. पक्षाने आदेश दिला तर भंडारा – गोंदियातून मी सुद्धा निवडणूक लढवेल. अन्यथा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणणार असल्याचे पटोले म्हणाले. रामटेक बाबत अजूनही निर्णय झाला नाही. वंचितसोबत चर्चा सुरु आहे. आज किंवा आणि उद्या याबाबत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली असून हे लोकशाहीला घातक आहे. राज्यात भ्रष्टाचार करणारे दादा मांडीला मांडी लावून बसले त्यांच्यावर मात्र कुठली कारवाई केली जात नाही. सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदेवर भ्याड हल्ला झाला आहे. सोलापुरात भाजपच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे घाबरुन भाजपने त्यांच्यावर भ्याड हल्ला केला, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

नागपुरात उमेदवार कोण राहणार हे लवकरच जाहीर करणार आहोत. नागपूरचे भाजप उमेदवार हे २०१४ आणि २०१९ ला पंतप्रधान होणारे उमेदवार होते. आता त्यांना धडकी भरवण्यासाठी काही वेगळी योजना करावी लागेल असेही पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackerays announcement of sangli seat is a problem for aghadi says nana patole vmb 67 mrj
Show comments