अमरावती : होळीनिमित्‍त आपल्‍या गावी जाणाऱ्या प्रवाशांची  आता लगबग सुरू झाली आहे. मुंबई आणि पुणे मार्गावरील सर्वच रेल्वेगाड्या होळीच्या निमित्ताने तुडूंब भरून वाहतात. मध्य रेल्वेने सोडलेल्या अतिरिक्त वा विशेष गाड्यांनाही आता चांगला प्रतिसाद मिळू लागला असून विशेष गाड्यांचीही तिकिटे जवळपास संपत आल्या आहेत. त्यामुळे होळीनिमित्त आणखी एका रेल्‍वेगाडीची सुविधा प्राप्‍त झाली आहे.

उधना ते खुर्दा रोड दरम्यान अतिरिक्त होळी विशेष रेल्वेगाडी चालवली जाणार आहे. होळी हा मोठा सण असल्याने गुजरातमधील अनेक नागरिक, विद्यार्थी गृहनगर अमरावती, बडनेरा येथे येत असतात. या मार्गावरील नियमित गाड्यांचे आरक्षण सहज मिळत नसल्याने त्यांना अतिरिक्त पर्याय म्हणून उधना ते खुर्दा रोड गाडी सोयीची ठरणार आहे. उधना – खुर्दा रोड साप्ताहिक विशेष गाडी क्र. ०९०५९ ही १२ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक बुधवारी उधना येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि खुर्दा रोड येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्र.०९०६० ही १४ मार्च ते २५ एप्रिलपर्यंत प्रत्येक शुक्रवारी खुर्दा रोड येथून उशिरा रात्री २ वाजता सुटेल आणि उधना येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचणार आहे.

मार्गात ही साप्ताहिक विशेष ट्रेन नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, तुमसर रोड, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांताबाजी, टिटलागड, केसिंगा, मुनीगुडा, रायगडा, पार्वतीपुरम, बोबबिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा, बेहरामपूर, बालूगन हे थांबे घेणार आहे. त्याचप्रमाणे एका प्रथम श्रेणी कोचसह द्वितीय वातानुकूलित, दोन द्वितीय वातानकूलित, ६ तृतीय वातानकूलित, ८ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी आणि एका सामान्य श्रेणी कोचसह लगेज- गार्डस कोच असे एकूण २२ कोच या विशेष साप्ताहिक गाडीला राहणार आहेत.

होळीनिमित्त अमरावतीकर चाकरमाने, व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना मुंबई, पुणे या दोन शहरांसाठी थेट विशेष ट्रेन हवी. कारण, मोठ्या सणाला नियमित रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नाही. अशात या विशेष ट्रेन जाणे-येणे करण्यासाठी उपयोगी ठरतात. घरापासून दूर असलेल्या प्रत्येकाला मोठा सण कुटुंबासह साजरा करावा, असे वाटत असते. त्यामुळे अमरावतीकरांनी होळीसाठी मुंबई, पुण्याला जाण्यासाठी विशेष रेल्‍वेची मागणी केली आहे.

Story img Loader