नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व प्रतिष्ठित उद्योग क्षेत्रातील मंडळींनी मिळून काही विशेष कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार केले असून जानेवारी २०२५ पासून विद्यार्थ्यांना यासाठी नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी दिली. विशेष म्हणजे वित्त, बँकिंग, विमा, प्रसार माध्यमे आणि व्यवस्थापन, रिअल इस्टेट आदी क्षेत्रांमधील अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश राहणार आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूरमध्ये आयोजित स्वायत्त महाविद्यालयांसाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर जगदेश कुमार बोलत होते.
यांना नोकरीची मोठी संधी
यूजीसी’च्या ‘स्वयंम’ संकेतस्थळावर अभ्यासक्रमांची माहिती मिळणार असून प्रवेशासाठी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच कुठलीही प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही. पदवीचे शिक्षण घेणारे, पदव्युत्तर विद्यार्थी, अर्धवट शिक्षण सोडलेले, व्यावसायिक आदी क्षेत्रात नवीन करिअर करण्यासाठी किंवा अधिक कौशल्याचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी या अभ्यासक्रमाचा फायदा घेऊ शकतात. ‘यूजीसी’ने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. ज्यात लवचिकता आहे. उदाहरणार्थ, मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करण्यात स्वारस्य असलेले विद्यार्थी विमा किंवा जोखीम व्यवस्थापनामध्ये शैक्षणिक श्रेयांक मिळवू शकतात. यामुळे त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढू शकतात.
हेही वाचा…दिवाळीत अवकाशात मनमोहक घडामोडींची पर्वणी,पृथ्वीवरुन पाच ग्रहांचे…
४.३ कोटी विद्यार्थी उच्चशिक्षण घेतात
आज देशात ४.३ कोटी विद्यार्थी उच्चशिक्षण घेत असून यातील दोन तृतीयांश विद्यार्थी बी.ए., बी.एस्सी. किंवा बी.कॉम. पदवी घेतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित शिक्षणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बँकिंग, वित्त आणि व्यवस्थापनाचे धडे गिरवता येणार आहेत. अशा प्रयोगातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्याचा यूजीसीचा उद्देश असल्याचे जगदेश कुमार यांनी सांगितले. योग्य मूल्यांकनानंतर यूजीसी महाविद्यालयांना स्वायत्तता देते. परंतु, संलग्न विद्यापीठ तसे करत नाही. यामुळे स्वायत्तता देण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जातो. आम्ही विद्यापीठांना भरपूर स्वायत्तता देतो. मात्र, ते महाविद्यालयांना समान स्वायत्तता का देत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला.
हेही वाचा…नागपूर पोलिसांकडून वसुलीचा ‘नाईट पॅटर्न’…. रस्त्यावरचे दिवे मालवून…
विद्यापीठाच्या सत्रांत परीक्षांसोबत परीक्षा
‘यूजीसी’ हे अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांना मूल्यांकनकर्ता म्हणून मान्यता देईल. या संस्था विद्यापीठांच्या सहकार्याने सत्रांत परीक्षांसोबत परीक्षा घेतील. त्यांचे ‘श्रेयांक’ पदवी कार्यक्रमासह एकत्रित केले जातील. विद्यार्थी श्रेयांकांची शैक्षणिक बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्मवर’ संग्रहित करू शकतील.