वर्धा : उच्च शिक्षण क्षेत्रात विविध पदे असतात. त्या पदांसाठी पात्रता परीक्षा घेण्यात येत असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याखेरीज नोकरीची संधी मिळत नाही. म्हणून या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी देशभरातून तयारी करतात. याच यूजीसी नेट परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजेन्सीकडून ही परीक्षा घेतली जाते. एनटीए वेबसाईटवर निकाल टाकण्यात आला आहे.
अधिकृत वेबसाईट म्हणून यूजीसी डॉट एनटीए डॉट एसी डॉट ईन ही मान्यताप्राप्त आहे. परीक्षार्थी यूजीसी नेट स्कोअर कार्ड देखील डाउनलोड करू शकतात. या निकालात तीन श्रेणीत पात्रता ठरते. २०२४ डिसेंबरमध्ये झालेल्या या परीक्षेत ५ हजार १५८ विद्यार्थी हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरलेत. ४८ हजार १६१ विद्यार्थी सहायक प्राध्यापक व पीएचडी प्रवेशासाठी तर १ लाख १४ हजार ४४५ विद्यार्थी केवळ पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यूजीसी नेटसाठी ८ लाख ४९ हजार १६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ४९ हजार ४९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
हा निकाल पाहण्यासाठी एनटीए अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक ठरते. या वेबसाईटच्या होम पेजवर लेटेस्ट न्यूज अंतर्गत निकाल किंवा स्कोअर कार्डशी संबंधित लिंकवर क्लिक करणे क्रमप्राप्त ठरते. त्यात इच्छुकस अर्ज क्रमांक, जन्मतारीख, दिलेला कोड टाकून सबमिट करावे लागेल. त्यानंतर निकाल पान उघडेल. तिथे तपासता येणार. नेट निकालासोबतच राष्ट्रीय परीक्षा एजेंसीने म्हणजेच एनटीए तर्फे अंतिम उत्तरपत्रिका पण जाहीर केली आहे. परीक्षा देणारे विद्यार्थी अंतिम उत्तर हे उत्तर की मार्फत प्रश्नांची उत्तरे जुळवू शकतात. मात्र विद्यार्थ्यांना अंतिम उत्तर पत्रिकेवर कोणताच आक्षेप नोंदविता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागत असतो. विविध अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये तसेच विद्यापीठ विभागात प्राध्यापक व संशोधनार्थी निवडल्या जात असतात. त्यासाठी नेट परीक्षेचे आयोजन देश पातळीवर होते. त्यातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना विविध पदे तसेच संशोधन छात्र वृत्तीसाठी पात्र ठरविण्यात येते. जाहीर झालेला निकाल लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणार. नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने निकाल जाहीर करतांनाच अंतिम उत्तर पत्रिकेवर कसलाच आक्षेप घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले, हे विशेष.