अमरावती : डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असताना त्याचे धोकेही समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात संगणक हाताळताना सुरक्षित राहता यावे, वेळीच त्याचे चांगले-वाईट परिणाम ओळखता यावे, यासाठी देशभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी सायबर सुरक्षेसाठी अभियान राबवावे, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. यासाठी यूजीसीने विशेष माहितीपुस्तिका देखील तयार केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध शाळांसोबतच महाविद्यालयांचे आणि विद्यापीठांचे वर्ग ऑनलाइन भरू लागल्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न शैक्षणिक संस्थांसाठी आव्हानात्मक बनला आहे. याच पार्श्वभूमिवर यूजीसीने सायबर सुरक्षेविषयीची ही माहितीपुस्तिका प्रकाशित केली आहे. देशभरातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्था यांना ही माहितीपुस्तिका पाठवण्यात आली असून त्यात प्रामुख्याने शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रशिक्षणावर भर दिला आहे.

हेही वाचा >>> १९४७ सारखेच वर्ष २०२५, सरकारी कर्मचाऱ्यांचा मात्र हिरमोड

शिक्षकांना तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, विद्यार्थ्यांचा मदतनीस आणि प्रत्यक्ष माहितीपट बनवणारा अशी तिहेरी भूमिका बजावावी लागेल, असे यूजीसीने म्हटले आहे. सायबर सुरक्षेसाठी सतर्क राहून धोकादायक बाबींना प्रतिबंध करण्याइतपत तंत्रसाक्षरता शिक्षकाकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन सत्रात कॅमेरे सुरू ठेवायला सांगणे, ऑनलाइन क्लासचे निमंत्रण विद्यार्थ्यांच्या अधिकृत मोबाइल नंबरवर पाठवणे, आदी सोपे उपाय राबवणे शक्य आहे, असे यूजीसीच्या माहितीपुस्तिकेत म्हटले आहे.

हेही वाचा >>> ‘मॅडम…  माझ्या हृदयातून मुलगा हरवला हो… मला शोधून द्या…’

डिजिटल युगात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात फिशिंग, डेटा चोरी, हॅकिंग आणि ऑनलाइन लूट आदी प्रमुख गुन्ह्यांचा समावेश आहे. हे केवळ व्यक्तीगत स्तरावरच नाही तर संस्थांना आणि संघटनांवरही गंभीर प्रभाव टाकत आहे. यूजीसीच्या अभियानाचा उद्देश याच धोक्यांविषयी आणि समस्यांविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. या उपक्रमातून शिक्षण संस्था यापासून वाचण्यासाठी आणि लढण्यासाठी तयार होतील.

माहितीपुस्तिकेत डिजिटल माध्यमांचा सुरक्षेसाठी उपयोग करण्याचे प्रकार सविस्तर पध्दतीने सांगण्यात आले आहेत. यात पासवर्ड सुरक्षा, फिशिंग हल्ल्यांपासून बचाव, सुरक्षित ऑनलाइन व्यवहार आणि व्यक्तिगत माहितीची सुरक्षा आदी विषयांवर सरळ आणि प्रभावी दिशानिर्देश देण्यात आले आहेत. सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना यूजीसीने निर्देश दिले आहेत की, त्यांनी सायबर सुरक्षेसाठी कार्यशाळा, चर्चासत्र आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. यात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वैयक्तिक माहिती आणि व्यावसायिक माहिती याची ऑनलाइन सुरक्षितता कशी ठेवावी, याचे मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याविषयी त्यांच्या परिणांमाविषयी जागरूक करण्यात यावे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ugc ordered all universities and colleges across the country to implement campaign for cyber security mma 73 zws